आरोग्य खात्याचा कारभार चव्हाट्यावर

आरोग्य खात्याचा कारभार चव्हाट्यावर

शिरूर, ता. १९ : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान रेखा अर्जुन हिलाळ (वय २८) या महिलेच्या मृत्यूनंतर ग्रामीण भागातील आरोग्य खात्याचा ढिसाळ कारभार आणि आरोग्य सेवेची उदासीनता चव्हाट्यावर आली आहे. एका दिवसात एका आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजनासाठी तब्बल ऐंशी महिलांना आणले गेले होते. त्यावरून एका महिलेच्या शस्त्रक्रियेला किती वेळ दिला गेला आणि हा वेळ म्हणजे घाईघाईत उरकून टाकण्याचा प्रकार नाही का? असे प्रश्न आता ग्रामीण भागातून विचारले जात आहेत.
टाकळी हाजी आरोग्य केंद्रात गुरुवारी (ता. १८) कुटुंब नियोजन शिबिरात टाकळी केंद्राच्या अखत्यारीतील ४२; तर कवठे येमाई आरोग्य केंद्राच्या अखत्यारीतून ३८ महिलांना आणण्यात आले होते. म्हणजे तब्बल ऐंशी महिलांवर दोन टप्प्यात कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यासाठी सर्व महिलांची पूर्वतपासणी करणे आवश्यक असते. त्याअंतर्गत बीपी, शुगर, हिमोग्लोबीन चेक करावे लागत असल्याची माहिती आरोग्य विभागातीलच सूत्रांनी दिली. या तपासण्यांचा वेळ वजा करता उरलेल्या वेळेत एवढ्या मोठ्या संख्येने कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करताना एका शस्त्रक्रियेसाठी किती वेळ दिला गेला असेल? हा संशोधनाचा विषय आहे. त्यासाठी किती आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती की तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार एकाच डॉक्टरने या शस्त्रक्रिया केल्या होत्या तर ते पुरेसे आहेत का, हे सवाल उपस्थित होत आहेत.
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेदरम्यान रेखा हिलाळ यांचा मृत्यू झाल्याने शस्त्रक्रियेसाठी आलेल्या इतर महिलांमध्ये घबराटीचे; तर त्यांच्या नातेवाइकांत संतापाचे वातावरण पसरले. कवठे आरोग्य केंद्रातून एकाच रुग्णवाहिकेतून अनेक महिलांना कोंबून या शस्त्रक्रियेसाठी आणले गेले असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. कवठे आरोग्य केंद्रातून आणलेल्या महिलांची तेथेच तपासणी करणे आवश्यक असताना ती गेली होती की नाही, याबाबत उलट-सुलट चर्चा आहे. रेखा हिलाळ यांना तर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी कवठे केंद्राने रिजेक्ट केले होते, अशी माहितीही पुढे आली आहे. असे असताना त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालीच कशी किंवा टाकळी केंद्रात तपासणी झाली असेल; तर त्यांचे फिटनेस सर्टिफिकेट कुणाकडे दिले गेले, हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.
याबाबत टाकळी हाजी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियांका घुगे यांच्याशी संपर्क साधण्याचा, प्रयत्न केला असता त्यांनी फोन कट केला.

चार ते पाच मिनिटात एका महिलेची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली जात असेल; तर हे चित्र भयावह आहे. शस्त्रक्रियेदरम्यान चूक होऊ शकते, हे मान्य केले तरी असा खेळ सर्रास खेळला जात असेल; तर ते अत्यंत घातक आहे. एक डॉक्टर एवढ्या शस्त्रक्रिया करीत असेल; तर त्याच्याकडून तरी काटेकोरपणाच्या अपेक्षा कशा करता येतील? कामचलावू लोकांकडून हे करून घेतले जात असेल; तर पुढेही अशा दुर्घटना होतच राहतील. रेखा अर्जुन हिलाळ या महिलेच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे व त्यात दोषी असणारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. त्याशिवाय ग्रामीण आरोग्य सेवेला शिस्त लागणे कठीण आहे.
- डॉ. सुभाष पोकळे, माजी पंचायत समिती सदस्य, शिरूर

रेखा पोकळे यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यावरच या विषयी ठामपणे काही सांगता येईल. एका आरोग्य केंद्रात एकावेळी साधारण ३५ ते चाळीस शस्त्रक्रिया केल्या जातात. तथापि, जनरल सर्जनच्या परवानगीने ऐनवेळी अधिकच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी दोन टप्पे केले जातात. कालच्या शिबिरातही दोन टप्प्यात या शस्त्रक्रिया केल्या गेल्या. संबंधित महिलेवरील शस्त्रक्रियेपूर्वी तिची तपासणी केली होती किंवा कसे, याची माहिती घेतली जाईल.
- डॉ. डी. बी. मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी, शिरूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com