
शिरूर येथे जल जन अभियान सुरू
शिरूर, ता. २२ : ‘‘सृष्टीवरील फारच कमी पाणी मनुष्य जीवनास उपकारक ठरत आहे. म्हणून या उपलब्ध पाण्याची सुरक्षितता बाळगणे आणि आहे ते पाणी दूषित होणार नाही याची खबरदारी घेणे हे सर्व समाजाचे आद्यकर्तव्य आहे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माऊंट आबू येथील मुख्यालयाचे मुख्य प्रवक्ते राजयोगी राहुलभाई यांनी येथे केले.
‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय व भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या देश पातळीवरील जल जन अभियानाचा शिरूर केंद्रातील प्रारंभ राहुलभाई यांनी दीपप्रज्वलनाने केला. मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेवराव घावटे, सोनेसांगवीच्या सरपंच रेखा मल्हारी काळे, शिरूर तालुका मुद्रक संघाचे अध्यक्ष बाबूराव पाचंगे, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुख राजश्री मोरे, शिरूर पंचायत समितीचे कार्यालयीन अधिक्षक डी. डी. होलगुंडे, चव्हाणवाडीचे ग्रामसेवक विकी पोळ, योगी दीदी, रोहित पठारे आदी यावेळी उपस्थित होते.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शिरूर केंद्राच्या संचालिका अर्चना बहेनजी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शकुंतला बहेनजी यांनी प्रास्ताविकात या अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेतला. सुप्रिया बहेनजी यांनी सूत्रसंचालन केले. गणेश कोळपकर यांनी आभार मानले.