
वडगाव रासाई येथील नोटीस वन विभागाच्या कायद्यानुसार
शिरूर, ता. २४ : जुन्नर वनविभागातील शिरूर वनपरिक्षेत्रांतर्गत वडगाव रासाई येथे भीमा नदीलगत वनविभागाचे १९२ हेक्टर क्षेत्र असून, ते राखीव वन म्हणून आरक्षित आहे. सन २०१३ ला या क्षेत्रावर अवैध वहिवाट करणाऱ्यांना नियमानुसार तेथून हटविले होते. असे असताना त्यांनी पुन्हा अतिक्रमण केल्याने ते हटविण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांनी दिली.
वनखात्याच्या क्षेत्रावर अतिक्रमण करणाऱ्यांनी आदिवासी वनहक्क कायद्यानुसार वनहक्क दावे जिल्हास्तरीय समितीकडे दाखल केले होते. मात्र, त्या समितीने हे दावे नामंजूर केले आहेत. त्यानंतरही संबंधितांकडे या क्षेत्रावरील मालकी सिद्ध करण्यासाठी काही पुरावे असतील; तर ते सादर करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु, त्यांच्याकडून याबाबत कुठलेही सबळ पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे जुन्नरच्या सहायक वनसंरक्षकांनी १७ मे रोजी क्षेत्र निष्कासीत करण्याबाबत आदेश दिले. त्यावर अखिल भारतीय किसान सभा व दावेधारकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असून, १९ मे रोजी झालेल्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने वनखात्याच्या आदेशाला सात जूनपर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे यापुढील कार्यवाही ही उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच होईल, असे म्हसेकर यांनी स्पष्ट केले. वनविभागामार्फत कायद्यानुसारच कार्यवाही केली असून, आदिवासी लोकांवर कुठल्याही प्रकारे अन्याय केला नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.