शिरूरमध्ये बिबट्याच्या डरकाळ्यांनी भीती
शिरूर, ता. १ : शहरानजिक वाहणाऱ्या घोडनदी किनारी असलेल्या अमरधाम जवळील सूरजनगर, सुशीला पार्क परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा वावर आढळून आला. यामुळे परिसरात घबराट पसरली. नदीकिनाऱ्यावरून मध्यरात्री बिबट्याच्या डरकाळ्या ऐकू येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करून बिबट्याला पकडण्यासाठी शनिवारी (ता.१) दुपारी सूरजनगर परिसरात पिंजरा लावला.
घोडनदी किनारी असलेल्या अमरधाम परिसरात गेल्या काही वर्षांत लोकवस्ती वाढली असली आणि सूरजनगरसह सुशीला पार्क ही मोठी गृहवसाहत उभी राहिली असली तरी त्यापलीकडे गर्द झाडी आहे. शिवाय नदीकिनारी सतरा कमानी पुलापर्यंत ऊसशेती, गोरक्षण पांजरपोळ संस्थेची शेती आहे. या परिसरात बिबट अधिवासासाठी सुस्थिती असल्याने बिबट्या येऊ शकतो, अशी शक्यता शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, डॉ. शेखर श्रीमंदिलकर, लटांबळे गुरुजी हे या परिसरात फिरायला गेले असता त्यांना काल रात्री बिबट्याचे दर्शन झाले. त्यांनी परिसरातील नागरिकांना कळविल्यानंतर मोठी गर्दी झाली. युवा नेते अमोल चव्हाण, सर्पमित्र नीलेश पाठक, मदन काळे, अशोक सोनवणे, रमेश रोहोकले, गणेश शेलार, साहिल झंजाड, मयूर शिंदे, योगेश चत्तर, मोहन पवार आदींनी परिसरात फिरून फटाके फोडून बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. तसेच स्थानिक नागरीकांना याबाबत अवगत करताना खबरदारीच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.
दरम्यान, वनपरिक्षेत्र अधिकारी गव्हाणे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी काल रात्री उशिरा घटनास्थळाला भेट दिली व आजदेखील परिसरात पाहणी केली. त्यावेळी बिबट्याच्या वावराबाबत खात्री पटल्याने दुपारी सूरजनगर परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला. या परिसरात मॉर्निंग वॉकला जाऊ नये, सायंकाळी व रात्री या परिसरात फिरू नये. या परिसरातील नागरिकांनी लहान मुलांना एकटे खेळायला सोडू नये, अडचणीच्या भागात रात्री-अपरात्री जाऊ नये, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
05811
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

