
नोकरीच्या आमिषाने सव्वा कोटींची गंडा
सासवड, ता. १२ : पुरंदर तालुक्यातील सासवडसह इतर १८ गावांतील ३८ जणांची वन खात्यातील नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून सुमारे १ कोटी २६ लाख रुपये रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. सासवडमधील एका युवकाच्या फिर्यादीनंतर पोलिस ठाण्यात फसवणूक झालेले सारेजण हजर झाले आणि सात जणांच्या टोळीचे रॅकेट उघड झाले. सातपैकी पाचजणांना अटकही झाली आहे.
अविनाश चंद्रकांत भोसले (रा. पुरंदरे वाडा परिसर, सासवड, ता. पुरंदर) असे यातील मुख्य फिर्यादीचे नाव आहे. या फिर्यादीचे एकट्याचे ३ लाख ८० हजार रुपये या टोळीने वन खात्यातील नोकरीसाठी घेतले. तर बाकी ३७ जणांचे असेच कमी अधिक पैसे घेतले व फसवणूक केली.
या प्रकरणातील आरोपींची नावे पुढीलप्रमाणे १) नामदेव मारुती मोरे, (वय ५७, रा. मोरेवस्ती, लिंगाळी, ता.दौंड) २) सुजाता महेश पवार, (वय ३३, रा. ज्ञानेश्वर निवास रूम नं. १२. स्मशानभुमी समोर, जेजुरी, ता.पुरंदर) ३) हरीशचंद्र महादेव जाधव, (वय ३२, रा. मांडकी, पाटीलवस्ती, ता.पुरंदर) ४) नरेश बाबूराव अवचरे (वय ३८ , रा. कोडीत, ता.पुरंदर), ५) राजेश बाबूराव पाटील (वय ६० रा. एस.आर.पी.कॅम्प ७ शेजारी बोरावकेनगर, ता.दौंड) ६) संतोष राजाराम जमदाडे (वय ३४ ,रा.वीर, ता. पुरंदर) ७) अजित गुलाब चव्हाण (वय ६७, रा.वीर,ता पुरंदर). या सर्व सातही आरोपींनी वरील लोकांकडून एकूण रुपये १,२६,००,००० रुपये (एक कोटी सव्वीस लाख) एवढी रक्कम घेवून वन खात्यामध्ये नोकरीस लावतो, असे सांगून फसविले. त्यासाठी त्यांनी बनावट नियुक्ती पत्र, ओळखपत्र, शिक्का, खाकी गणवेश असे विविध साहित्य वापरून रोख स्वरूपात तसेच बॅक खात्यावर रक्कम घेऊन लोकांचा विश्वास घात करून त्याची फसवणूक केली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व तपास अधिकारी विनय झिंजुरके यांनी सांगितले.
जानेवारी २०२१ ते १२ मे २०२२ या दरम्यान नोकरीच्या लावण्याच्या बहाण्याने सातजणांच्या टोळीने सासवडसह जेजुरी, वीर, पुणे, पिंपरी चिंचवड, आदी ठिकाणी बेरोजगार तरुणांची फसवणूक केली. नकली जॉयनिंग लेटर, ओळखपत्र, बोगस ड्रेसकोड देऊन व त्यात इतर तरुणांचे फोटो दाखवून इच्छुकांना गंडवले आहे. आरोपींपैकी नामदेव मारुती मोरे आणि राजेश बाबूराव पाटील हे दोघे फरारी आहे.
फिर्यादी अविनाश भोसले यांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता ३८ जणांशी समक्ष वा दूरध्वनीवर काल संपर्क करून तुमची वनखात्यातील नोकरीसाठी पैसे घेऊन फसवणूक झाली का?, याची आम्ही खात्री केली. त्यानंतरच आज फिर्याद दाखल करून सातपैकी पाचजणांना अटक केली. दोघा फरारांचा शोध सुरु आहे.
- विनय झिंजुरके, पोलीस उप निरीक्षक व तपास अधिकारी सासवड पोलिस ठाणे
Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01770 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..