
वारस नोंदीऐवजी केले खरेदी खत
सासवड, ता. १३ : पिंपरी (ता. पुरंदर) येथील एका महिलेच्या पतीच्या नावावर असलेल्या जमिनीवर तिची वारस नोंद करण्याचे काम काही वकील व त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपविले होते. त्यांनी ही वारस नोंद न करता चक्क जमिनीचेच खरेदी खत करून घेतले. तसेच, पैसे दिल्याचेही खोटे दाखविले. त्यामुळे संबंधित महिलेने सासवड (ता. पुरंदर) येथील वकीलासह काही साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली असून, सासवड पोलिसांनी एकूण पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी माहिती दिली की, या गुन्ह्यात अॅड. किरण सुरेश फडतरे (मयत), सौरभ रामचंद्र वढणे, सुरेश भिकोबा फडतरे, अॅड. तुषार विजय मिरजकर, अनिल विनायक जगताप (सर्व रा. सासवड, ता. पुरंदर) हे संशयित आरोपी असून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर, फिर्यादी संगीता महादेव शेंडकर (रा. पिंपरी) या आहेत. संगीता यांचे पती गेली २० वर्षांहून अधिक काळ बेपत्ता आहेत. त्यांचा बराच शोध घेतला ते मिळून आले नाहीत किंवा स्वतःही घरी परत आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाकडून मयत घोषित करून पिंपरीची जमीन संगीता शेंडकर यांच्या नावे वारस हक्काने करण्याबाबत आदेश घेतले. त्यातून मार्च २०१६ ते डिसेंबर २०२१ या दरम्यान वारस हक्काने जमिनीवर संगीता यांची वारस नोंद करण्याचे काम या पाच लोकांवर त्यांनी सोपविले. मात्र, आरोपींनी संगीता यांच्या पतीच्या पिंपरी येथील जमिनीवर तिची वारस नोंद करण्याच्या नावाखाली वारस नोंद केलीच. पण, गट नं. १०१, ४०७, ४६५ या जमिनीच्या ५४ गुंठे क्षेत्र फसवून खरेदी खत करून घेतले. वारस नोंदीचे काम सुरु असल्याचे सांगूनच सहायक निबंधक कार्यालयात या महिलेस नेले. संगीता यांना सही येत नाही, तरीही त्यांची खोटी सही करून पॅनकार्ड, ॲक्सिस बँकेचे अकाउंट काढून घेतले. जमीन खरेदीचा मोबदला संगीता शेंडकर यांनी घेतला. हे खोटे दाखविण्यासाठी अकाउंटवर पैसे जमा केले. ते पैसेही आरोपींनी परस्पर काढून घेतले. संगीता यांनी सासवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01800 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..