
पुरंदरमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार
सासवड, ता. २३ : ‘‘पुरंदर तालुक्यातील सासवड व जेजुरी नगरपालिका आणि पुरंदर-हवेलीतील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना स्वबळावर व धनुष्यबाणासह लढेल. त्यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला सत्तेवरून खाली खेचल्याचा राग शिवसैनिकांमध्ये पाहण्यास मिळत आहे. त्यातून कट व गट करून राहिलेल्यांना एकवटलेले शिवसैनिक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत,’’ असा इशारा शिवसेनेचे उपनेते व आमदार सचिन अहीर यांनी दिला.
सासवड (ता. पुरंदर) येथे आमदार अहीर व विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रमेश जाधव, शिवसेनेचे सासवड शहर प्रमुख अभिजित जगताप, हवेलीचे शंकर हरपळे, संदीप धाडसी मोडक, उल्हास शेवाळे, दादा कामठे, अॅड. राजेंद्र काळे, रामभाऊ झगडे, प्रसाद खंडागळे, अप्पा सकट, धनाजी पवार, सुभाष पवार, सोमनाथ खळदकर आदी उपस्थित होते. पुरंदर-हवेलीतील कार्यकारिणी बदलली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत अहीर यांनी बैठकीत दिले. तसेच, सामान्य कार्यकर्ते, नव्या चेहऱ्यांनाही जुन्यांबरोबर निवडणुकीत संधी देण्याचे स्पष्ट केले.
अहीर म्हणाले, ‘‘अगोदर आम्ही शिवसेनेतच, बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आमची वाटचाल म्हणणारे आता शिंदे गट म्हणून का बसलेत? ते आता ठाकरे घराण्यावर टीका करू लागलेत. याचा अर्थ कडव्या शिवसैनिकांपुढे शिंदे गट व त्यांच्याबरोबर गेलेले लोक निरुत्तर व्हायला लागले आहेत. शिवसेना शाखा हे देऊळ असते. तुम्ही देऊळच सोडून सत्तेच्या लोभापायी पक्षप्रमुख व एका सच्चा मुख्यमंत्र्याला म्हणजे उद्धव ठाकरे यांना फसवून गेला. ही फसवणूक व तुमचे पळून जाणे, तळातील शिवसैनिकाला मान्यच झाले नाही. त्यामुळे शिवसैनिकांचे लोंढे मातोश्रीवर येताहेत. आता कोणाच्या परवानगीची व पासची गरज नाही.’’
बारामतीकरांमुळे गुंजवणी पाणी प्रकल्प सडतोय, विमानतळ, राष्ट्रीय बाजार गेला, असे विजय शिवतारे म्हणतात. यावर अहीर म्हणाले, ‘‘मधे हेच शिवतारे म्हणाले होते, ‘अजितदादा पवार यांच्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. ते आदरणीय नेते आहेत.’ आमचे काही म्हणणे नाही, हवे तर लोटांगण घाला.’’
जलयुक्तमधील खेकडे शोधू : गोऱ्हे
मागील सरकारच्या वेळी पुरंदरमधील तत्कालीन लोकप्रतिनीधी व जलसंधारण-जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या कार्यकाळात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांमध्ये आर्थिक घोटाळा झाला होता. त्याविषयावर विधान परिषद उपसभापती म्हणून आपण या स्थितीत काही हालचाल करणार का, या प्रश्नी निलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘त्यावेळी काही बंधारे फुटले होते. तर खुलासा आला की, खेकड्यांनी बंधारे फोडले. आता मग वेळ आली तर व वरिष्ठांनी लक्ष घातले तर जलयुक्तमधील खेकडे पुन्हा शोधू.’’
Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01835 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..