सासवडच्या अंजीर `स्प्रेड` उत्पादनाला देशभरात पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवडच्या अंजीर `स्प्रेड` उत्पादनाला देशभरात पसंती
सासवडच्या अंजीर `स्प्रेड` उत्पादनाला देशभरात पसंती

सासवडच्या अंजीर `स्प्रेड` उत्पादनाला देशभरात पसंती

sakal_logo
By

श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा
सासवड, ता. २५ : पुरंदर तालुक्यामधील भौगोलिक मानांकन (जी.आय.) नोंदणी झालेल्या अंजीर उत्पादक शेतकऱ्यांची अंजिरे युरोपात निर्यात करण्यात यश आल्यानंतर अंजिराच्या नावीन्यपूर्ण प्रक्रिया उत्पादनात पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनीने यश मिळविले. विविध तपासण्या करून प्रमाणपत्रे मिळविली व आता अंजीर प्रक्रियेद्वारे `ब्रेड स्प्रेड` तयार करून ते ग्राहकांच्या पसंतीला उतरल्याने हे उत्पादन राज्यासह देशाच्या बाजारपेठेत विक्रीसाठी खुले केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. ते पाहून आता परदेशी निर्यातीसाठी जर्मन, जपान, ऑस्ट्रेलिया आदी काही देशातील बाजारपेठांमध्ये पुरंदरच्या उत्पादन नमुनेही पाठविले आहेत, अशी माहिती पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रोहन सतीश उरसळ यांनी दिली.

कंपनीचे अध्यक्ष रोहन सतीश उरसळ म्हणाले, की अंजिरापासून प्रक्रियेद्वारे `स्प्रेड` तयार करण्यात व ग्राहकांच्या पसंतीला उतरण्याचे यश मिळाले. कंपनीने प्रारंभी १० टन अंजिरे उणे २५अंश सेल्सिअस तापमानात ठेवली होती. त्यानंतर प्रक्रियेद्वारे `स्प्रेड` तयार करून विविध हॉटेल्स, कुक, गृहिणी आदींना देऊन प्रतिसाद तपासला. त्यातून कंपनी अंजिराच्या प्रक्रियेद्वारेचा `स्प्रेड` सहा महिन्यांच्या मेहनतीतून बाजारात उतरविण्यात याआधी यशस्वी झाली होती. आता या उत्पादनास अल्पावधीत चांगला प्रतिसाद मिळतोय. अंजिरापासून प्रक्रियेद्वारे `स्प्रेड`ची उत्पादने २१० व ३० ग्रॅमच्या बाटलीत उपलब्ध आहेत. बाटलीनिहाय किमत अनुक्रमे २२५ व ५० रुपये आहे. अगोदर अॅमेझॉन या ई- कॉमर्ससह पुण्यातील प्रसिद्ध ग्राहक पेठ व डागा ब्रदर्स या सुपर स्टोअरमध्ये उत्पादने विक्रीला ठेवली होती. अगोदर १५ हजार बाटल्या विक्रीस उपलब्ध होत्या. त्यास प्रतिसाद मिळाल्याने प्रतिदिनी एक टन माल जाधववाडी (ता.पुरंदर) येथील प्रक्रिया प्रकल्पावर तयार केला जात आहे.


पुरंदर हायलँडच्या संचालकांपैकी अतुल कडलग हे सुक्ष्म जीवशास्त्र विषयातील तज्ज्ञ असल्याने प्रक्रियेचा भार त्यांनी उचलला. आता राज्यातील बाजारपेठेत उत्पादन विक्रीला खुले केले. पण देशांतर्गत कंपनीचे सागर धुमाळ, संपत खेडेकर, समील इंगळे आदींनी कोलकत्ता, हैद्राबाद, दिल्ली, बंगळूर, कोची, भोपाळ, इंदूर आदी ठिकाणी बाजारपेठ मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

असे आहे अंजीर स्प्रेडचे उत्‍पादन
१. स्प्रेडमध्ये अंजीर पल्पचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७५ टक्क्यांपर्यंत
२. प्रक्रियेत प्रिझर्व्हेटिव्ह्ज, अॅडीटिव्हज वा रंगद्रव्याचा समावेश नाही
३. अस्सल नैसर्गिक चव या स्प्रेडमध्ये मिळते
४. अंजिरे मीठा बहरात कंपनीच्या खरेदी केंद्रावर संकलित
५. साल काढून स्लाइस फ्रोझन प्रक्रिया करून मागणीनुसार स्प्रेड प्रक्रीया
५. बाटलीचे आकर्षक पॅकिंग व पुरंदर हायलँड आणि सुपर फीग हे कंपनीने दोन ब्रँडनेम तयार.
६. मोठे घरगुती तर छोटे पॅकिंग तारांकित व इतर हॉटेल्समध्ये ब्रेकफास्टसाठी उपयोगी


प्रक्रिया उद्योगासाठी ६५ लाखांचा खर्च
पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रोहन सतीश उरसळ यांच्या नेतृत्वाखाली संचालकांनी जाधववाडी (ता.पुरंदर) येथे जाधवगड हॉटेलच्या मार्गावर ६.५ हजार चौरस फूट क्षेत्राचे शेड भाडेतत्वावर घेतले. तिथे प्रकल्पातील मशिनरी व यंत्रणा उभारली. तिथेच संपूर्ण हायजेनिक (आरोग्यदायी), नियंत्रित हवामान स्थितीत अंजिरावर प्रक्रीया सुरू केली. याकरिता सुमारे ६५ लाख रुपये खर्च आला तर २५ लाख रुपये कर्जस्वरुपात बँक ऑफ इंडियाकडून घेतले. सध्या दरदिवशी प्रति बॅच एक टन अंजीर स्प्रेड उत्पादनाची
क्षमता आहे. पुढे प्रक्रीया क्षमता वाढती राहणार आहे.


कंपनीतील गुंतवणुक पाहता व बारा महिने प्रक्रीया उत्पादने मिळण्यासाठी अंजीर निर्यात, अंजीर स्प्रेडबरोबरच अंजीर ज्यूस व बाकी फळांवर प्रक्रीया करण्याचे प्रयोग कंपनीने हाती घेतले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना रास्त दर मिळतो, तर लोकांना रोजगारही मिळतोय. त्यात पुढे वाढ होईल.``
- रोहन उरसळ, अध्यक्ष, पुरंदर हायलँड शेतकरी उत्पादक कंपनी

----------------
02701,
अंजीर `ब्रेड स्प्रेड`चे उत्पादन

Web Title: Todays Latest District Marathi News Swd22b01884 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..