ट्रॅक्टरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ट्रॅक्टरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक
ट्रॅक्टरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक

ट्रॅक्टरच्या आमिषाने शेतकऱ्याची फसवणूक

sakal_logo
By

सासवड, ता. २० : कोडीत बुद्रुक (ता.पुरंदर) येथील मारुती वामन जरांडे (वय ४९, धंदा - शेती) शेतकऱ्यास समाजकल्याण विभागामार्फत दादासाहेब गायकवाड सबलिकरण कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत २५ टक्के रक्कम भरून ट्रॅक्टर मिळवून देण्याच्या बहाण्याने भोरमधील तिघांनी २ लाख ४० रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. आरोपींमध्ये भोरमधील एका पोलिस पाटलाचा आरोपीत समावेश आहे.

याप्रकरणी सासवड पोलिस ठाण्यात विजय नारायण ओव्हाळ (रा. रावडी ता. भोर), नीलेश अशोक साळुंके (पोलिस पाटील रायरी, ता. भोर) व अमित शिवाजी कांबळे ऊर्फ समाजकल्याचे थोरात साहेब (रा. वडतुंबी ता. भोर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी मारुती जरांडे हे २१ ऑक्टोबर २०२१ रोजी सासवड (ता.पुरंदर) तहसिल कार्यालयात आले होते. तिथे त्यांचे मित्र विनायक काशिनाथ गायकवाड (रा.बोपगाव ता.पुरंदर) हे भेटले. त्यांच्याबरोबर विजय ओव्हाळ व समाज कल्याण विभागाचे गळ्यात आयकार्ड घातलेले थोरातसाहेब हे होते. ते म्हणाले की, समाज कल्याण विभागामार्फत दादासाहेब गायकवाड सबलीकरण कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंतर्गत पंचवीस टक्के रक्कम भरून कुबोटो कंपणीचा ट्रॅक्टर २७ एच.पी. विजय ओव्हाळ यांचा भाऊ . नितीन ओव्हाळ व साळुंके (रा. रायरी ता. भोर) यांना मंजूर झाला आहे. या ट्रॅक्टरसाठी मूळ किमतीच्या पंचवीस टक्के रक्कमेची जुळवाजुळव होत नाही. त्यामुळे तुम्हाला (फिर्यादीला) ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर पहा, असे सांगितले. गायकवाड हे फिर्यादीचे मित्र व ओळखीचे आणि रीतसर तुम्हाला लिखापडी करून देवू, असे त्या मंडळींनी बजावले. त्यात साळुंके हे भोर तालुक्यातील रायरी गावचे पोलिस पाटील असल्याने मनात शंका राहीली नाही. त्यानंतर आरोपी ओव्हाळ, थोरात व साळुंके यांना ता. २२ आक्टोबर २०२२ रोजी सासवडच्या संत सोपानकाका बॅंक लि.चा चेक नं. १५५३५२ रक्कम रुपये १,५५,१४५ तसेच उर्वरित खर्चाकरिता चेकने ८४,८५५ रुपये असे एकूण रु. २,४०,००० रकमेचे दोन बेअरर चेक दिले. सदर योजनेचे लाभार्थी साळुंके हे असून त्यांनी मला रक्कम मिळाले नंतर ट्रॅक्टर देण्याचे हमीपत्र लिहून दिले. मी दोन्हीही चेक त्यांचे नावे दिले. दरम्यान, दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ट्रॅक्टर मिळेल असे सांगूनही फिर्यादीला ट्रॅक्टर मिळाला नाही.
संशयितांकडे वारंवार विचारणा केल्याने व पैशांसाठी तगादा लावल्याने अखेर समझोता होऊन कॅनरा बॅंकेचे दोन चेक फिर्यादीला दिले. मात्र, खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ते परत आले. दरम्यान, समजकल्याणचे थोरातसाहेब नाव सांगणाऱ्या तोतयाचे खरे नाव अमित शिवाजी कांबळे (रा.वडतुंबी ता.भोर) हे ही स्पष्ट झाले.