पुरंदर तालुक्यात भात काढणी निम्म्यापर्यंत उरकली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदर तालुक्यात भात काढणी निम्म्यापर्यंत उरकली
पुरंदर तालुक्यात भात काढणी निम्म्यापर्यंत उरकली

पुरंदर तालुक्यात भात काढणी निम्म्यापर्यंत उरकली

sakal_logo
By

सासवड, ता. २२ ः पुरंदर तालुक्याच्या किल्ले पुरंदर परिसर व डोंगरी भागात भाताचे आगार आहे. यंदा पिकाच्या प्रारंभी पाऊस झाला नाही, तसेच पीक निसवताना व पिकाच्या फुलोऱ्याच्या काळात परतीचा पाऊस लांबल्याने यंदा भात काढणीस बराच विलंब झाला. हळवी भात काढणी पूर्णत्वाच्या मार्गावर असली. तरी गरवी भात काढणी आता निम्म्यापर्यंत उरकली आहे. अजून आठ ते दहा दिवस काढणीची कामे चालतील, मात्र भात उत्पादकतेत घट
जाणवत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पीक निसविण्यावर विपरीत परिणाम
भातपीक क्षेत्र वाढायला हवे होते, परंतु, नंतर सततच्या पावसाने रोपे वाहून गेली. लावणीची रोपेही काही ठिकाणी वाहिली. त्याचा परिणाम होऊन क्षेत्र सरासरीएवढेच राहीले. उशिरा खरीपामुळे भात पिकाला फुटवे निघून पीक निसविण्यावर विपरीत परिणाम झाला. भात मोहरत असताना पावसाची संततधार राहीली, मोहर काहीसा धुवून गेल्यामुळे दाणा भरण्यावर परिणाम दिसून आला. त्याचाच उत्पादकतेवर परिणाम होत घट दिसत आहे, असे काळदरीचे अंकुश परखंडे, चिव्हेवाडीचे बाळासाहेब साबळे, केतकावळेचे सतीश बाठे, पानवडीचे अप्पा भिसे, संदीप भिसे आदी शेतकऱ्यांनी सांगितले.

पुरंदर तालुक्यातील भात पिकाचा आढावा
भात पिकाचे सरासरी क्षेत्र : ३,०२०.३८ एकर
भात रोपवाटिकांचे सरासरी क्षेत्र : २५५ एकर
रोपवाटिकांमध्ये टाकलेले रोपे : २८९ एकर
पुनःलागणी झालेले क्षेत्र : २० ते २५ टक्के

इंद्रायणीचा दर वाढणार...
पुरंदर तालुक्यातील चव व सुवास यामुळे इंद्रायणी भात प्रसिद्ध आहे. गतवर्षी ४८ ते ५० रुपयांचा किलोचा इंद्रायणीचा दर ५० ते ५५ रुपयांच्या घरात पोचला होता. यंदा नुकसानीमुळे इंद्रायणीचा दर ५५ ते ६० रुपये राहील. तर तांदळात इंडम वाण ४० रुपये किलो, कोलम ४५ ते ५० रुपये राहील. भात पीक उत्पादकता व एकूण पीक नुकसानीमुळे उत्पादन घसरल्याने, ही किमान दरवाढ राहील, असा अंदाज भात उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

पुरंदरमधील भाताच्या खोऱ्यातील गावशिवारात उंचावरील शेतजमिनीत सोयाबीन, भुईमूग, उडीद, घेवडा, पावटा आदीही पिके खरीप हंगामात घेतात. यंदा या पिकांची पेरणी उशीर झाली होती. मात्र २० ते २५ टक्के पिके नंतरच्या संततधार पावसात वाहून गेली किंवा सडली. राहिलेल्या पिकांनाही परतीच्या धुतले. पावसामुळे पिकात विविध प्रकारचे तण वाढल्यामुळे ही पिके सुद्धा किमान ६५ ते ८० टक्के नुकसानीत गेली. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे, त्यास आधार मिळाला पाहिजे.
-अंकुश परखंडे, अध्यक्ष विकास सोसायटी, काळदरी

‘‘पुरंदर तालुक्याच्या किल्ले पुरंदर परिसरात व डोंगरी भागात इंद्रायणी भात पीक अधिक होते. परंतु, इंद्रायणी वाणात इतर वाणांचे मिश्रण होत असल्याने मूलभूत, पायाभूत किंवा प्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा कार्यक्रम हाती घ्यावा लागणार आहे. त्यातून इंद्रायणी वाणाची येथील खासियत अजून वाढून परंपरा जपली जाईल.
- सूरज जाधव, तालुका कृषी अधिकारी, पुरंदर.