ग्रामीण भागात ‘पीएमपी’ बस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्रामीण भागात ‘पीएमपी’ बस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान
ग्रामीण भागात ‘पीएमपी’ बस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान

ग्रामीण भागात ‘पीएमपी’ बस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान

sakal_logo
By

सासवड, ता. ९ : पीएमपीएमएलने पुरंदर तालुक्यातील ग्रामीण भागातील बंद केलेले मार्ग बुधवार (ता.७) पासून पूर्ववत सुरु केल्याने नागरिक व विद्यार्थी यांनी समाधान व्यक्त केले आहे. हे मार्ग पुन्हा सुरू व्हावे, म्हणून खासदार सुप्रिया सुळे व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी पीएमपीएमएल प्रशासनाला विनंती केली होती. तसेच वारंवार पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
पुरंदर तालुक्यातील सासवड ते उरुळीकांचन (ता. हवेली), हडपसर ते जेजुरी, हडपसर ते मोरगाव, यवत ते सासवड हे मार्ग एसटी बंदच्या काळात आमदार जगताप यांच्या प्रयत्नांमुळे पीएमपीएमएल बस सुरू केल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थी यांची प्रवासाची चांगली सोय झाली होती. परंतु पीएमपी प्रशासनाने हे मार्ग तोट्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेतला होता. यातील काही मार्गावर एसटीने गाड्या सुरू करणे आवश्यक होते. परंतु त्या गाड्या सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे एसटी पण नाही आणि पीएमपीएमएल बस नाही, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वांची गैरसोय होत होती. ‘पीएमपी’ बसमुळे जेजुरी, नारायणपूर, कोडीत, वीर याठिकाणी जाणाऱ्या भाविकांची चांगली सोय झाली होती. ‘पीएमपी’ने बस बंद केल्याने झालेल्या गैरसोयीचा विचार करून ‘पीएमपी’ बस सेवा ग्रामीण भागात आवश्यक असल्याचे मत खासदार सुळे व आमदार जगताप यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे ‘पीएमपी’ प्रशासनाने ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत केल्याने विद्यार्थी व नागरिकांकडून समाधान व्यक्त केले. तसेच खासदार सुळे व आमदार जगताप, ‘पीएमपी’ व्यवस्थापन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.