पुरंदरमधील ‘महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ आयुक्तांना भावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरंदरमधील ‘महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ आयुक्तांना भावली
पुरंदरमधील ‘महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ आयुक्तांना भावली

पुरंदरमधील ‘महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ आयुक्तांना भावली

sakal_logo
By

सासवड, ता. १५ ः झेंडेवाडी (ता.पुरंदर) येथे महिला शेतकऱ्यांनी सुरुवातीला घरगुती खाद्यपदार्थ करण्यासाठी स्वयंसहायता महिला बचत केला. मात्र त्यापुढे जाऊन जिद्दीतून गटाचे रूपांतर ‘पुरंदर लक्ष्मी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’त केले. तेवढ्यावरच न थांबता प्रकल्पासाठी शेड उभारले. तसेच वाटाणा, सीताफळ, चिकू, आंबा, जांभुळ यावर प्रक्रीया करीत स्वतःची यंत्रणा, शीतकरण यंत्रणा, हार्डनर, कोल्ड स्टोअरेज घेत सुमारे दोन कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पास नुकतीच कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी भेट देऊन या महिलांचे कौतुक केले.
राज्याच्या कृषी खात्याचा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पुरंदर तालुक्यात सुनील चव्हाण यांनी नुकतीच पहिली भेट दिली. त्यावेळी त्यांनी राज्यातील केवळ महिलांनी चालविलेल्या ‘पुरंदर लक्ष्मी महिला शेतकरी उत्पादक कंपनी’ला भेट दिली. यामध्ये विशेषतः सीताफळ, चिकू, आंबा, जांभुळ यावर प्रक्रीया करून त्याचे पल्प (गर) वेगळे करून त्याची साठवणूक व विक्री केली जातेच. मात्र या कंपनीने पल्प (गर) सुकविण्याचे व ते ड्राय स्वरूपात चांगले मूल्य मिळवीत विकण्याचे तंत्र कृषी आयुक्त चव्हाण यांना चांगलेच भावले.
यावेळी चव्हाण म्हणाले, ‘‘देशात आणि जगाच्या बाजारपेठेत ड्राय फ्रूट, ड्राय प्रक्रियायुक्त उपपदार्थांना मोठी बाजारपेठ आहे. त्यासाठी तुम्हा महिलांना आणखी संधी निर्माण करून देण्यास माझी यंत्रणा मदत करेल.’’
याप्रसंगी कंपनीच्या अध्यक्षा संगीता झेंडे, स्नेहल खटाटे, मनिषा खटाटे व संचालक महिला, तसेच कंपनीचे सहायक विठ्ठल झेंडे यांनी आयुक्त चव्हाण यांचे स्वागत करीत विस्तृत माहिती दिली. प्रारंभी गटाचा ५५ लाख रुपये व्यवसाय होता. कंपनीत रूपांतर झाल्यावर गतवर्षी उलाढाल १५ लाखांवर पोचली. यंदा २२ लाखांवर उलाढाल जाईल. भविष्यात एक कोटी उलाढालीचे उद्दिष्टे ठेवल्याचे संगीता झेंडे यांनी सांगितल्यावर आयुक्त चव्हाण यांनी समाधान व्यक्त करीत प्रोत्साहन दिले.
आयुक्त चव्हाण यांनी याचदिवशी पुरंदर तालुक्यातील कृषीविषयक विविध नावीन्यपूर्ण प्रक्रिया उपक्रमांना भेट दिली व त्याविषयी माहिती जाणून घेतली. त्यांच्यासमवेत निविष्ठा व गुण नियंत्रण कृषी संचालक दिलीप झेंडे, बारामतीचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव, शेखर कांबळे, गणेश जगताप आदी उपस्थित होते.

काळेवाडीत २३ प्रकारच्या फळांवर प्रक्रीया
काळेवाडी (ता.पुरंदर) येथील ‘मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग’ अंतर्गत स्थापन केलेल्या श्रीकृष्ण कोल्ड स्टोरेज कंपनी प्रकल्पास आयुक्त चव्हाण यांनी आवर्जून भेट दिली. त्यावेळी ज्ञानेश्वर पाटील व रेवणनाथ जाधव यांनी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या उत्पादनांची माहिती दिली. सीताफळ, अंजीर, पेरू, चिकू आदी २३ प्रकारच्या फळांवर येथे प्रक्रियेचे काम चालू असल्याचे त्यांनी पाहिले. या फळांवर प्रक्रियेद्वारे पल्प, स्लाईस, फ्रोझन फ्रूट करून त्याची विशिष्ट तापमानात साठवणूक व नंतर विक्री केली जाते, असे स्पष्ट केले. तालुक्यातील पीक उत्पादन, प्रक्रीया उत्पादनाचा आढावा यावेळी तालुका कृषी अधिकारी सूरज जाधव यांनी दिला.

आयुक्तांना पुरंदर पेरू केकची भेट
जाधववाडी (ता.पुरंदर) येथील रोहन उरसळ अध्यक्ष असलेल्या पुरंदर हायलँड फार्मर प्रोड्यूसर कंपनीच्या प्रक्रिया उद्योगासही आयुक्तांनी भेट दिली. यावेळी प्रक्रियेची जबाबदारी सांभाळणारे संचालक अतुल कडलग, अंजीर उत्पादक व संशोधन संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर यांनी कंपनीने फळांपासून तयार केलेल्या उत्पादांनांविषयी माहिती दिली. आयुक्तांनी कंपनीने केलेल्या प्रगतीबद्दल सर्व संचालक मंडळाचे अभिनंदन केले व उत्पादन ते विक्री व्यवस्थेतील अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी पुरंदर हायलँड्स शेतकरी उत्पादक कंपनीने निर्मित अंजीर ब्रेड स्प्रेड, पेरू ब्रेड स्प्रेड, आंबा स्प्रेड इत्यादी उत्पादनांची माहिती दिली व कयानी बेकरीमार्फत पुरंदर पेरूपासून निर्मित केक आयुक्तांना भेट दिला.

ग्रामीण भागातील शेतकरी हळू-हळू शेती उत्पादन व प्रक्रियेत तरबेज होतोय. परंतु पणन व्यवस्थेत असलेल्या मध्यस्थांमुळे नफा विभागला जातोय. हा नफा शेतकरी व शेतकरी गट किंवा शेतकरी कंपन्यांना थेट पदरात पडावा, म्हणून गटांमार्फत व कृषी इतर यंत्रणांमार्फत पणन साखळी मजबूत करण्यावर आपण भर देणार आहोत.
- सुनील चव्हाण, कृषी आयुक्त