कृषी प्रक्रीया उद्योग विस्ताराची पुरंदर तालुक्याला संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी प्रक्रीया उद्योग विस्ताराची 
पुरंदर तालुक्याला संधी
कृषी प्रक्रीया उद्योग विस्ताराची पुरंदर तालुक्याला संधी

कृषी प्रक्रीया उद्योग विस्ताराची पुरंदर तालुक्याला संधी

sakal_logo
By

कृषी प्रक्रीया उद्योग विस्ताराची
पुरंदर तालुक्याला संधी

शेतीत एकरी नफा किती मिळतो, हे आता महत्त्वाचे झाले आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाकडे त्यासाठीच लक्ष हवे. लाखो तरुणांना रोजगार देण्याची क्षमता या उद्योगात आहे. पुरंदर तालुक्यात सद्यःस्थितीत बोटावर मोजइतके म्हणजे लहान-मध्यम स्वरुपातील २० ते २५ कृषी प्रक्रीया उद्योग सुरु आहेत. पण, प्रक्रीया हा उद्योग आणखी संख्येने विकसित केल्यास तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधींबरोबर प्रक्रीया, विक्री, वाहतूक, वितरण आदी टप्प्यांमध्ये अनेक लोकांची गरज भासेल. पुरंदरमध्ये या उद्योगामुळे आणखी क्रांती येऊ शकेल आणि शेती व्यापारक्षम होऊन परवडणारी होईल.

- श्रीकृष्ण नेवसे, सासवड

जगात विकसित देश प्रगत बनण्याचे खरे कारण सक्षम शेती विकासातच आहे. वाळवंटी इस्राईलसारखा देश शेती विकासाने पुढे आहे. आधुनिक माहिती व तंत्रज्ञानाच्या शिक्षणामुळे या काही प्रगत देशांमध्ये उच्च शिक्षीत तरुण शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे आकर्षित झाले. त्यामुळे रोजगाराच्या फार मोठ्या संधी तिथे उपलब्ध झाल्या. शेतीमाल उत्पादनात चीन प्रथम व भारत जगात दुसरा आहे. परंतु, उत्पादकता पाहिली तर आपण मागे आहोत. भारताला हवामानाचे आणि नैसर्गिक सामग्रीचे वरदान लाभले आहे. त्यामुळे येथे वैविध्यपूर्ण शेतीमाल पिकविला जाऊ शकतो. परंतु, शेतीतील उदासीनतेमुळे हे चित्र पाहण्यास मिळत नाही. तीच तऱ्हा महाराष्ट्रात काही भागात दिसते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर हा तालुका असाच दुष्काळी पट्ट्यात येतो. त्यामुळे बहुतांशी जमीन ही कोरडवाहू, कमी पाणी, मजुरांचा प्रश्न, रोग-कीड समस्या, नैसर्गिक संकटे, बाजारभाव शाश्वत नसणे, आदी समस्या आहेतच. त्यातून पारंपरिक शेती तंत्रात बदल करणे गरजेचे आहे. त्यामुळे उपलब्ध स्त्रोतामध्ये चांगले उत्पादन घेणे, शेती व्यवस्थापन योग्य करणे, शिक्षित तरुण शेतीत आणणे भविष्यात गरजेचे आहे.
शासनाच्या फळबाग लागवड (रोहयो) कार्यक्रमामुळे व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानामुळे फळे आणि भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र पुरंदरला दिवसेंदिवस वाढतच आहे. तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण हवामानामुळे येथे पिकणाऱ्या सीताफळ, अंजीर, डाळिंब, पेरू, वाटाणा इत्यादी शेतीमालास व भाजीपाल्यांस वैशिष्ट्यपूर्ण स्वाद असल्याने.. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यात अलीकडे काही नवी पिढी शेतीत प्रयोगशील झाल्याचे पाहण्यास मिळते, पण तीही संख्या हवी तेवढी अपेक्षित नाही.

प्रक्रियेला व्यापारीदृष्ट्या संधी
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणीनुसार शेतीमालाचे उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रीया केली पाहिजे. जागतिक उदारीकरणाच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या कक्षा रुंदावल्या आहेत. कृषी प्रक्रियायुक्त पदार्थ जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येत आहेत. मागणीही वाढत आहे. दळणवळणाच्या अत्याधुनिक सुविधांमुळे शेतमाल वा प्रक्रियायुक्त पदार्थ एका टोकापासून दुसऱ्या टोकाला कमी वेळेत पोचतात. त्यामुळे सध्यस्थितीत कृषी म्हणजे शेती पिकवणे नव्हे; तर शेतीपूरक उद्योगाचाही (जसे प्रक्रीया उद्योग) समावेश होतो. त्यातून पुरंदरला भविष्यात व्यापारीदृष्ट्या निरनिराळ्या शेतमालापासून तयार करता येणारे प्रक्रियायुक्त टिकाऊ पदार्थ निर्मिती उद्योग महत्त्वाचा राहणार आहे, असे मत अंजीर संघाचे अध्यक्ष अप्पासाहेब काळभोर, रामचंद्र खेडेकर, रोहन उरसळ, संगीता झेंडे, नितीन इंगळे, समीर इंगळे, मोना ढुमे, सीताफळ संघाचे संचालक माउली मेमाणे, गौरव कोलते, म्हस्कू खेडेकर, नरेंद्र पवार या प्रक्रियेतील संबंधीतांसह कृषी यंत्रणेतील संचालक दिलीप झेंडे, सहसंचालक सुनील बोरकर, कृषी अधिकारी सूरज जाधव आदींनी सांगितले.

पुरंदरमधील शेतीमाल व त्याचे प्रक्रियायुक्त पदार्थ
पिकाचे नाव- प्रक्रियायुक्त पदार्थ
१ अंजीर- सुके अंजीर, जॅम, अंजिराचे हवाबंद डबे (कॅनिंग), कॅण्डी (फळे पाकवणे)
२ आवळा- चवनप्राश, मोरावळा, लोणची, सुपारी, कॅण्डी, सरबत, पल्प, चहा
३ डाळिंब- जेली, रस, सरबत, नेक्टर, डाळिंब पाक, अनारदाना, चूर्ण, फ्रोझन दाणे, सालीची भुकटी

४ पेरू- सरबत, गर, जेली, चॉकलेट, पेरू वडी
५ पपई- कच्या पपईपासून टुटीफुटी, पिकल्या पपईपासून जॅम, सरबत, पेपेन
६ बोर- बोर खजूर, सुकविलेली फळे, बोरकुट, लोणचे, मोरंब्बा, सरबत, जॅम, सिरप
७ सीताफळ- पल्प, आइस्क्रीम, मिल्क शेक, गर सुकविणे
८ टोमॅटो- केचप, स्वास, पेय, चटणी, पल्प भुकटी, पेस्ट
९ वाटाणा- गोठवलेला वाटाणा, वाळविलेला वाटाणा

व्यापारी दृष्टिकोन हवा
उत्पादन वाढत असताना शेतकऱ्यांच्या पुढे दुसऱ्या अनेक समस्या निर्माण झाल्यात. त्यातील एक समस्या म्हणजे, शेतीमालास योग्य भाव न मिळणे. उत्पादन वाढते त्यातून बाजारभाव पडतात. त्यातून नुकसान होते. आज एकरी नफा किती मिळतो, हे महत्त्वाचे आहे. म्हणजेच व्यापारीदृष्ट्या शेती करणे गरजेचे आहे. शेतातील तयार झालेला माल थेट ग्राहकांपर्यंत गेला पाहिजे किंवा त्यावर प्रक्रीया करून जादाचा नफा मिळवणे, यालाच व्यापारीदृष्ट्या शेती म्हणतात. फळे व पालेभाज्या हा नाशवंत माल असून, उत्पादित केलेल्या मालाच्या २० ते ३० टक्के मालाची नासाडी होते. परंतु, शेतातून काढलेल्या मालाची दुप्पट किंवा कितीतरी पटीने मूल्यवृद्धी करण्याची शक्ती प्रक्रीया उद्योगात आहे. त्यामुळे प्रक्रीया उद्योगच शेतीला आधार देऊ शकतात. देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ त्यास मोठी संधीच संधी आहे. या मार्गाने प्रक्रियेतून वर्षभर शेतकऱ्यांना व युवा पिढीला पैसे मिळू शकतात. त्यासाठी शेतीमाल काढणी तंत्र, पॅकिंग, वाहतूक, प्रक्रीया याद्वारे शेती व शेतकरी समाधानी होईल. विकसित देशात शेतीमाल प्रक्रीया प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत व भारतात ६ टक्केच आहे. पुरंदरला तर प्रक्रियेचे प्रमाण संधी असूनही अजून ३ टक्क्याच्या वर गेले नाही. त्यातून शेती तोट्यात दिसते. लाखो तरुणांना रोजगार शेतीतून व प्रक्रीया उद्योगातून मिळेल. हा आशावाद पुरंदरमध्ये मोठा आहे. त्यामुळेच पुरंदरमधील नियोजित प्रक्रीया उद्योग हजारो हातांना काम देतील, शेतकऱ्यांच्या प्रगतीला हातभार लावतील. गावांचा, खेड्यांचा शेतशिवाराचा विकास होत राहील.

पुरंदरमधील उपलब्ध जमीन, पाण्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेतमालाचे चांगले व उच्चांकी उत्पादन घेणे शक्य आहे. येथील फळांना व भाजीपाल्यास जागतिक बाजारपेठेत मागणी आहे. सीताफळ व अलीकडे काहीअंशी अंजिरात ते सिद्ध झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची कास त्यासाठी धरावी लागेल. निर्यातीची संधी आहे, पण सामुहिक गटशेतीसारखे प्रयोग करून चांगले व्यवस्थापन केल्यास निर्यातीस संधी आहे. निर्यातीची संधी प्रक्रियायुक्त मालास तर अधिक आहे. त्यासाठी भविष्यात होणारे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ तर जागतिक बाजारपेठ जवळ आणण्यास मोठी मदतच करणारे ठरेल. त्यात नव्याने पाणी, सिंचन संधी काही झाल्यात. काही संधी निर्माण होताहेत. राष्ट्रीय बाजार आणण्याचे संकेत मिळतायेत. फक्त नव्या पिढीच्या शेतकऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे.
- डॉ. विक्रम कड, विभाग प्रमुख,
कृषी काढणी पश्चात तंत्रज्ञान, राहुरी म. फु. कृषी विद्यापीठ
(मूळगाव- नायगाव, ता. पुरंदर)