
सासवडमधील ‘शिवसृष्टी’ लवकरच खुली होणार
सासवड, ता. १५ : सासवड नगरपालिकेचे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय म्हणजेच ‘शिवसृष्टी’ येथे सुरु असलेल्या कामांची तसेच शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा परिसरातील होत असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप नुकतीच यांनी केली. सदर शिवसृष्टी वास्तूची जागा ऐतिहासिक असून याठिकाणी पूर्वी पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांची दप्तराची इमारत होती. या जागेची ऐतिहासिक परंपरा लक्षात घेऊन नगरपालिकेने शिवसृष्टी इमारत बांधली आहे. ही शिवसृष्टी लवकरच नागरिकांसाठी खुली होईल, असे आमदार जगताप यांनी सांगितले.
सध्या या शिवसृष्टी वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा, शिवमंदिर राज्याभिषेक सोहळा, सिंहासनावरील पूर्णाकृती पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील विविध देखाव्यांची चित्रणे, शिवकालीन शस्त्रांचे, विविध शैलीतील चित्रांचे प्रदर्शन आदी होत असलेल्या कामांची माहिती यावेळी वास्तू रचनाकार संग्राम चव्हाण, अभियंता प्रतीक काकडे यांनी दिली. या प्रसंगी सरदार घराण्यातील अप्पासाहेब पुरंदरे, माजी उपनगराध्यक्ष यशवंतकाका जगताप, अजित जगताप, सागर जगताप, संतोष गिरमे, कॅप्टन किरण पुरंदरे, विलास जगताप, संभाजी जगताप, हेमंत सोनवणे, हरिश्चंद्र जगताप, आनंद जगताप आदी उपस्थित होते.