
छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जाधव
सासवड, ता. ४ : राज्यस्तरीय १४ व्या छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बालाजी जाधव यांची निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी प्रशांत पाटणे यांची निवड झाली. तर निमंत्रकपदी सुनील धिवार व सचिन भोंडे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक दशरथ यादव यांनी दिली.
मराठी साहित्य संशोधन परिषद व जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद यांच्या वतीने दरवर्षी सासवड (ता. पुरंदर) येथे १२ मार्च रोजी राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते.
डॉ. जाधव इतिहासाचे अभ्यासक असून त्यांनी अनेक व्याख्याने दिली आहेत. स्वागताध्यक्ष प्रशांत पाटणे यांचा पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात मोठा वाटा आहे. बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धिवार सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतात. निमंत्रक सचिन भोंडे सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत.
आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात संमेलन होणार आहे. सकाळी ११ वाजता ग्रंथपूजन, दुपारी १२ वाजता संमेलन उद्घाटन, पुरस्कार वितरण समारंभ होईल. दुपारी २ वाजता साहित्यिक छत्रपती संभाजी महाराज या विषयावर परिसंवाद असून, सायंकाळी ४ वाजता कविसंमेलन आणि समारोप समारंभ होईल.
संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, शामकुमार मेमाणे, नंदकुमार दिवसे, दत्ता भोंगळे, सुनील लोणकर, गंगाराम जाधव, दत्ता कड, संजय सोनवणे, दीपक पवार, विजय तुपे, सुरेश वाळेकर आदी करीत आहेत.