
पांडेश्वरमधील बोरमलनाथ सोसायटी प्रथम
सासवड, ता.८ : खरीप हंगामाच्या पीककर्ज वाटपाला एप्रिल महिन्यात सुरुवात होणार आहे. यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संलग्न असणाऱ्या विकास सोसायट्यांमध्ये सध्या कमाल कर्ज मर्यादा पत्रक ( क.म.) तयार करण्याचे काम सचिव मंडळींकडून सुरू आहे. यावर्षी जिल्ह्यात सर्वप्रथम क. म. तयार करून त्याला मंजुरी मिळण्याचा मान पुरंदर तालुक्यातील पांडेश्वर येथील बोरमलनाथ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने पटकावला आहे.
आर्थिक वर्षातील खरीप हंगामाकरिता शेतकरी सभासदांना २०२३-२४ मध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत पीक कर्ज वितरण करण्यात येते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत मंजूर करण्यात येणारे ''कमाल कर्ज मर्यादा पत्रक'' चे (क.म.)पूजन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात सोमवारी (ता. ७ ) झाले. यावेळी बँकेच्या कार्यकारी, कर्ज समितीमध्ये संचालक मंडळाच्या सभेमध्ये मान्यता घेऊन पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पहिले कमाल कर्ज मर्यादा पत्रक पांडेश्वर (ता.पुरंदर) येथील बोरमलनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे मंजुरीपत्र बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय टापरे, उपसरव्यवस्थापक संजय शितोळे यांच्या हस्ते संस्थेचे संस्थापक उत्तमराव शिंदे यांना खरीप हंगाम कर्जवितरणासाठी सुपूर्द करण्यात आले. यावेळी बँकेचे अधिकारी छगन इंगळे, गिरीश जाधव, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे उपस्थित होते.
''पुरंदरला २०० कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट''
पुरंदर हवेलीचे आमदार तथा जिल्हा बँकेचे संचालक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२ - २३ मध्ये पुरंदर तालुक्यातील २६ हजार ८९८ सभासदांना १८५ कोटी २८ लाख ६० हजार रुपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेच्या पुरंदर विभागामधील १३ शाखांमध्ये ४०७ कोटी ८ लाख ६३ हजार रुपयांच्या ठेवी आहेत. ९७ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या बँकेला संलग्न आहेत. गतवर्षी पुरंदर विभागाला १७ कोटी रुपये नफा झाला आहे. नियमित पीककर्ज भरणा-या १४ हजार ६२६ सभासदांपैकी ८ हजार ६५ सभासदांना ३२ कोटींहून अधिक प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे. २०२३ - २४ मध्ये दोनशे कोटी रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट असल्याचे विभागीय अधिकारी महेंद्र खैरे यांनी सांगितले.
03378