
कऱ्हे काठी रंगणार कुस्त्यांचा आखाडा
सासवड, ता. १२ : उत्कृष्ट आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘पुरंदरच्या लाल मातीचा राजा’ कुस्ती स्पर्धा रविवारी (ता. २६) व सोमवारी (ता. २७) सासवडच्या कऱ्हे काठावरील नगरपालिकेच्या भैरवनाथ कुस्ती स्टेडीयम येथे रंगणार आहेत. यंदा स्पर्धेचे १६ वे वर्ष आहे. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि सासवड येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था व पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने होत आहे. सहकार महर्षी स्व. चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ पुरंदर हवेलीचे आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असल्याची माहिती कुस्तीगीर संघाचे सचिव पैलवान रवींद्रपंत जगताप यांनी दिली.
रविवारी (ता. २६) सकाळी नऊ वाजता भैरवनाथ कुस्ती स्टेडीयममध्ये मल्लांची वजने घेण्यात येतील. दुपारी चार वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होईल. सोमवारी (ता. २७) अंतिम सामने झाल्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे. या प्रसंगी कुस्ती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ मल्लाला राज्यस्तरीय ‘आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक केसरी’ आणि पुरंदर हवेली मतदार संघातील कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मल्लांना ‘मल्हार केसरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पूर्वी हिंदकेसरी मारुती माने, गणपतराव आंदळकर, श्रीपती खंचनाळे, हरिश्चंद्र बिराजदार, दादू चौगुले, उत्तमराव पाटील, चंद्रहार पाटील, दीनानाथ सिंह आदींना राज्यस्तरीय आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक केसरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच २०२२ चे हिंदकेसरी अभिजित कटके आणि २०२२ चे महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्या पुरंदर हवेली मतदार संघातील मल्लांचाही सन्मान आखाड्यात करण्यात येणार आहे.
प्रसिद्ध कुस्ती निवेदक शंकर पुजारी हे या स्पर्धेचे समालोचन करणार आहेत. नियोजनाच्या बैठकीला जिल्हा कुस्तीगीर संघाचे राजेंद्र जगताप, बाळासाहेब कोलते, तालुका कुस्तीगीर संघाचे मोहन जगताप, विनोद जगताप, अशोक झेंडे, अण्णा कामथे, अभिजित मोडक, तानाजी काकडे, चंद्रकांत गिरमे, रमेश जगताप, भाऊ मोरे, गुलाब गायकवाड, संतोष सोनवणे, शरद जगदाळे, संतोष काळांगे, हरिभाऊ जेधे, शेखर कटके, तात्या झेंडे, लक्ष्मण दिघे, रघुनाथ जगताप, कानिफनाथ आमराळे, दीपक जगताप, प्रशिक्षक माऊली खोपडे, आंतरराष्ट्रीय कोच तानाजी जाधव आदी उपस्थित होते.
‘पुरंदरच्या मल्लांनाच सहभागी होता येणार’
या कुस्ती स्पर्धांत पुरंदर व हवेली मतदार संघातील मल्लांनाच सहभागी होता येणार असून, त्यासाठी रहिवासी पुरावे देणे बंधनकारक आहे. ३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५, ६०, ६६, ७४ किलो वजन गट आणि मानाच्या पुरंदरच्या लाल मातीचा राजा किताब आणि चांदीच्या गदेसाठी खुल्या गटात स्पर्धा होणार असल्याचे सचिव रविंद्रपंत जगताप यांनी सांगितले. इच्छुक स्पर्धकांनी सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, श्री शिवाजी व्यायाम मंदिर, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने करण्यात आले आहे.