कऱ्हे काठी रंगणार कुस्त्यांचा आखाडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कऱ्हे काठी रंगणार कुस्त्यांचा आखाडा
कऱ्हे काठी रंगणार कुस्त्यांचा आखाडा

कऱ्हे काठी रंगणार कुस्त्यांचा आखाडा

sakal_logo
By

सासवड, ता. १२ : ‘पुरंदरच्या लाल मातीचा राजा’ कुस्ती स्पर्धा रविवारी (ता. २६) व सोमवारी (ता. २७) सासवडच्या कऱ्हे काठावरील नगरपालिकेच्या भैरवनाथ कुस्ती स्टेडीयम येथे रंगणार आहेत. यंदा स्पर्धेचे १६ वे वर्ष आहे. पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने आणि सासवड येथील पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था व पुरंदर तालुका कुस्तीगीर संघाच्या वतीने होत आहे. सहकार महर्षी स्व. चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ आमदार संजय चंदुकाका जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असल्याची माहिती कुस्तीगीर संघाचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी दिली.
रविवारी (ता. २६) सकाळी नऊ वाजता भैरवनाथ कुस्ती स्टेडीयममध्ये मल्लांची वजने घेण्यात येतील. दुपारी चार वाजता या स्पर्धेचे उद्‍घाटन होईल. सोमवारी (ता. २७) अंतिम सामने झाल्यानंतर बक्षीस वितरण होणार आहे. या प्रसंगी कुस्ती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ज्येष्ठ मल्लाला राज्यस्तरीय ‘आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक केसरी’ आणि पुरंदर हवेली मतदार संघातील कुस्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मल्लांना ‘मल्हार केसरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, हिंदकेसरी अभिजित कटके आणि महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांचा विशेष गौरव करणार आहे. राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केलेल्या पुरंदर हवेली मतदार संघातील मल्लांचाही सन्मान करण्यात येणार आहे.
नियोजनाच्या बैठकीला जिल्हा कुस्तीगीर संघाचे राजेंद्र जगताप, बाळासाहेब कोलते, तालुका कुस्तीगीर संघाचे मोहन जगताप, विनोद जगताप, अशोक झेंडे, अण्णा कामथे, अभिजित मोडक, तानाजी काकडे, चंद्रकांत गिरमे, रमेश जगताप, भाऊ मोरे, गुलाब गायकवाड, संतोष सोनवणे, शरद जगदाळे, संतोष काळांगे, हरिभाऊ जेधे, शेखर कटके, तात्या झेंडे, लक्ष्मण दिघे, रघुनाथ जगताप, कानिफनाथ आमराळे, दीपक जगताप, प्रशिक्षक माऊली खोपडे, आंतरराष्ट्रीय कोच तानाजी जाधव आदी उपस्थित होते.
या कुस्ती स्पर्धांत पुरंदर व हवेली मतदार संघातील मल्लांनाच सहभागी होता येणार असून, त्यासाठी रहिवासी पुरावे देणे बंधनकारक आहे. ३०, ३५, ४०, ४५, ५०, ५५, ६०, ६६, ७४ किलो वजन गट आणि मानाच्या पुरंदरच्या लाल मातीचा राजा किताब आणि चांदीच्या गदेसाठी खुल्या गटात स्पर्धा होणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, श्री शिवाजी व्यायाम मंदिर, पुरंदर नागरी सहकारी पतसंस्था याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.