
सासवडला एसटीच्या चालक वाहकांचा सन्मान
सासवड, ता.१५ : नोकरीच्या निमित्ताने गेली अनेक वर्षे एस.टी. बसचा प्रवास करणारे हेमंत ताकवले या बँक अधिकाऱ्याने सेवानिवृत्त झाल्यावर नेहमीच्या एस.टी.च्या मार्गावरील चालक व वाहक यांचा सत्कार केला. यावेळी चालक महादेव बडधे आणि वाहक प्रदीप जरांडे यांचा शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पिसर्वे येथील बँक ऑफ इंडियाचे अधिकारी हेमंत ताकवले हे अनेक वर्षांच्या सेवेनंतर नुकतेच सेवा निवृत्त झाले. सासवड सूपे (बारामती) या एस. टी. बसचा त्यांचा अनेक वर्षे प्रवास होता. या काळात अनेक वाहक, चालक, आगारातील अन्य अधिकारी तसेच कर्मचारी यांचा त्यांच्याशी ऋणानुबंध जुळला. याच भावनेतून बडधे आणि जरांडे यांचा सत्कार करण्यात आला.
एस. टी. महामंडळाचे वरिष्ठ सांख्यिकीय अधिकारी सुरेश लोणकर, स्थानक प्रमुख प्रवीण माळशिकारे, एस.टी. कर्मचारी सोसायटीचे संचालक महेश भोंगळे, स्व. एकनाथकाका जगताप प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप, एस.टी. कर्मचारी गणेश कुतवळ, संतोष शिंदे, राहुल टिळेकर, प्रवासी संघटनेचे नासीर बागवान, मोहन नातू, सरला शितोळे, सुशीला झेंडे, नायगाव ग्रामपंचायतच्या माजी सदस्या मंदा कड यांसह अनेक प्रवासी यावेळी उपस्थित होते. आठवणीने चालक व वाहक यांचा सत्कार केल्याबद्दल आगार व्यवस्थापक सागर गाडे, कर्मचारी संघटनेचे कैलास जगताप आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले
-----------
03401