यांत्रिकीकरणाचे शेतकऱ्यांच्या खात्यात ५६८ कोटी जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यांत्रिकीकरणाचे शेतकऱ्यांच्या खात्यात ५६८ कोटी जमा
यांत्रिकीकरणाचे शेतकऱ्यांच्या खात्यात ५६८ कोटी जमा

यांत्रिकीकरणाचे शेतकऱ्यांच्या खात्यात ५६८ कोटी जमा

sakal_logo
By

श्रीकृष्ण नेवसे : सकाळ वृत्तसेवा
सासवड, ता. २६ : मजूरटंचाईवर मात करण्यासाठी आणि शेतीच्या कामांना गती आणण्याकरिता कोणत्याही कृषी यंत्रापेक्षा बहुउद्देशिय ठरणाऱ्या ट्रॅक्टरच्या खरेदीत लक्षणीय वाढ झालेली आहे. खरे तर कोविडच्या साथीनंतर मजूर टंचाई वाढली व राज्याच्या शेती क्षेत्रात कृषी यांत्रिकीकरण करण्यावर मोठा भर दिला जात आहे. यामुळे ट्रॅक्टर अनुदान वितरणाचा आकडा वाढून आतापर्यंत केवळ वर्षभरात १४ हजार ४२९ शेतकऱयांच्या खात्यात १७६.०४ कोटी रुपये जमा केले आहेत. तर यांत्रिकीकरणातील विविध औजरांसाठी ८१ हजार ५०८ शेतकऱ्यांसाठी ३९२.०९ कोटी रुपये अनुदान जमा केले.

कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले की, मार्चअखेरपर्यंत २७१.७८ कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. कोरोना निर्बंधात शेतीमालाचे नुकसान झाले. परप्रांतिय व दूर गावचे मजूर माघारी गेले. त्यामुळे मजूर टंचाई तुलनेत वाढली. मात्र, निर्बंध हटल्यानंतर यांत्रिकीकरणाला वेग आला. सुशिक्षित बेरोजगार, कृषी पदवीधर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील तरुण शेती क्षेत्राशी संलग्न असलेल्या उपक्रमांमध्ये वा व्यावसायात आलेले आहेत. ट्रॅक्टर कंपन्यांकडून शेतकऱ्यांना किमान ८ तर कमाल ७० अश्वशक्तीपर्यंतचे ट्रॅक्टर विकण्यास उपलब्ध केले जात आहेत. कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण व राष्ट्रीय कृषी विकास योजना या तीन योजनांमार्फत कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणाच्या यंत्रसामग्रीसाठी विविध पद्धतीने अनुदान दिले जाते. याबाबत परींचे येथील शेतकरी हनुमंत सोळसकर यांनी समाधान व्यक्त केले.

२०२२ - २३ मधील वितरीत यंत्रसामग्री (रक्कम रु. कोटीत)

क्र. यंत्रसामग्री प्रकार ---------- वितरीत संख्या -- रक्कम
१. ट्रॅक्टर ---------- १४,४२९ -- १७६.०४
२. पॉवर टिलर ---------- ३,१२२ -- २५.१८
३. ट्रॅक्टरचलीत अवजारे -------- ७२,६२६ -- ३३२.६७
४. स्वयंचलीत अवजारे --------- १,४४६ -- १०.११
५. बैल व मनुष्यचलीत अवजारे - ३,०७१ -- १.७६
६. काढणीपश्चात यंत्रसामग्री ---- ९५० -- १०.२४
७. अवजारे बँक ----------- २९३ -- १२.१३

तीन वर्षातील यांत्रिकीकरणची स्थिती
एकूण प्राप्त अर्जसंख्या : २८.३६ लाख
निवड झालेले लाभार्थी संख्या : १४.२६ लाख
नाकारले वा रद्द झालेले अर्ज : १०.९७ लाख
लाभ घेतलेले एकुण लाभार्थी : १.७९ लाख
प्रलंबित असलेले लाभार्थी : १४.१० लाख
-----
दृष्टिक्षेपात योजना
* यांत्रिकीकरणात सर्वाधिक ट्रॅक्टरचलीत अवजारांना मागणी
* गेल्या आर्थिक वर्षात २८ हजार अवजारांना १२६ कोटींचा निधी
* यंदा ८१ हजार ५०८ अवजारांना ३९२ कोटी दिले
* गेल्या आर्थिक वर्षात ट्रॅक्टरसाठी ८१ कोटी दिले होते
* यंदा १४,४२९ ट्रॅक्टरसाठी १७६ कोटींचा निधी
* ट्रॅक्टरच्या किंमती ३.५ लाख ते १२ लाख रुपये
* ट्रॅक्टरला अनुदान मर्यादा प्रत्येकी १.२५ लाख रुपये
* ट्रॅक्टर खरेदीत नाशिकसह नगर, पुणे, कोल्हापूरच्या शेतकऱ्यांची आघाडी
* अवजारांना घटकनुसार किंमतीच्या ४० ते ५० टक्के अनुदान मर्यादा
* मार्चअखेरपर्यंत २७१.७८ कोटी मिळण्याची अपेक्षा

राज्यात यंदा यांत्रिकीकरणासाठी ५६८.१३ कोटींचे विक्रमी अनुदान वाटप झाले. यांत्रिकीकरणाने शेती कामाला गती येत असल्याने, शेतकरी प्रतिसाद पाहता मार्चनंतरच्या वर्षात तर याच्याही दीडपट अनुदान मागितले जाईल.
- दिलीप झेंडे, संचालक, कृषी आयुक्तालय, पुणे

बैलबारदाना संभाळणे आता कमी झाले आहे. ट्रॅक्टरमुळे व इतर यंत्रसामुग्रीमुळे मजूर टंचाईवर बऱ्यापैकी मात करता येतेय. घरच्या शेतीचे काम होतेच, शिवाय जोडधंद्याच्या पद्धतीने बाहेरील कामेही शेतकऱ्यायाला घेता येतात.
- शंकर झेंडे, दिवे, ता. पुरंदर