
पुरंदरमधील बेघरांची अतिक्रमणे नियमित करण्याची मागणी
सासवड, ता. २० : ‘‘पुरंदर तालुक्यातील बेघर असणाऱ्या किंबहुना राहण्यास घर नसणाऱ्या ज्या नागरीकांनी निवासी वापरासाठी गायरान जमिनीत किंवा ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण केलेले आहे, ते एक नागरिक म्हणून त्यांचा मूलभूत हक्क समजून, असे अतिक्रमण नियमित करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भूमिहीन बेघरांना न्याय मिळावा, यासाठी लढा उभारला जाणार आहे,’’ अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुरंदर तालुकाप्रमुख अभिजित जगताप यांनी दिली.
याबाबत त्यांनी पुरंदरचे प्रभारी तहसीलदार दत्तात्रेय गवारी यांना लेखी निवेदन दिले असून, पुरंदर तालुक्यातील शासकीय गायरान जमिनीवरील अतिक्रमणे वरिष्ठांच्या आदेशाने सरसकट निष्काशीत करण्याबाबतच्या विषयावर या निवेदनातून लक्ष वेधले आहे. शिवाय सासवडचे प्रांत अधिकारी मिनाज मुल्ला यांच्याशी चर्चा करून त्यांचे या प्रश्न लक्ष वेधले आहे. जोपर्यंत पुरंदर तालुक्यातील भूमिहीन बेघरांचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आपल्या म्हणजेच महसूल विभागाच्या वतीने कोणतीही कारवाई व कार्यवाही करण्यात येवू नये, अन्यथा पक्षाच्या तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.