
रांजणगावात झेंडू पवार यांचा सत्कार कुस्तीतील योगदानाबद्दल चांदीची गदा देऊन गौरव
तळेगाव ढमढेरे, ता. ५ : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील कुस्ती प्रशिक्षक आणि शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पहिलवान झेंडू पवार यांचा नुकताच रांजणगाव गणपती येथे मान्यवरांच्या हस्ते चांदीची गदा देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार नीलेश लंके, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, कुस्ती स्पर्धा आयोजक चंद्रशेखर पाचुंदकर, उद्योजक दत्तात्रेय पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या स्वाती पाचुंदकर, सुभाष उमाप, पहिलवान रामभाऊ सासवडे, सदाशिव पवार, बापूसाहेब शिंदे, कानिफनाथ गव्हाणे, राजेश लांडे व कुस्तीप्रेमी उपस्थित होते.
पवार यांना वयाच्या आठव्या वर्षापासून कुस्ती खेळाची आवड आहे. त्यांना तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. सतराव्या वर्षीच त्यांनी कुस्ती प्रशिक्षक म्हणून कुस्ती क्षेत्रात पदार्पण केले. या क्षेत्राची वाढ होण्यासाठी शिरूर तालुका कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून हा खेळ जनसामान्यांत पोचविण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. त्यांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनामुळे अनेक खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत. लालमातीतील व मॅटवरील कुस्तीचा तसेच कुस्तीच्या नवीन नियमांचा अभ्यास करून नवोदित मल्लांना मार्गदर्शन करीत त्यांनी तालुक्यासह जिल्ह्यात नावलौकिक मिळवला आहे.
येत्या काळातही कार्यरत राहणार
आगामी काळातही नवोदितांना मार्गदर्शन करून कुस्ती क्षेत्राविषयी आवड निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या ते विविध कुस्ती आखाड्यांत पंच म्हणून काम करीत आहेत. गेली दोन वर्षे कोरोनामुळे या क्षेत्राला मरगळ आली होती. त्यामुळे अनेक होतकरू तरुण यापासून दुरावले होते. पहिलवान मंडळींना अनेक दानशूर व्यक्ती स्वखुशीने मदत करतात आणि कुस्ती खेळायला प्रोत्साहन देतात, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, आमदार अशोक पवार यांनीही कुस्ती प्रशिक्षक झेंडू पवार यांचे विशेष कौतुक केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Tgd22b01553 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..