‘पीएमपी’ने प्रवाशांच्या सोईसाठी पूर्वीप्रमाणे दैनिक पास सुरू करावा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीएमपी’ने प्रवाशांच्या सोईसाठी
पूर्वीप्रमाणे दैनिक पास सुरू करावा’
‘पीएमपी’ने प्रवाशांच्या सोईसाठी पूर्वीप्रमाणे दैनिक पास सुरू करावा’

‘पीएमपी’ने प्रवाशांच्या सोईसाठी पूर्वीप्रमाणे दैनिक पास सुरू करावा’

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. ४ : पुणे महापालिका कार्यक्षेत्राच्या बाहेर तळेगाव ढमढेरे, रांजणगाव एमआयडीसी आणि इतर दूर अंतराच्या मार्गावर ‘पीएमपी’च्या बसेस नित्यनियमाने धावतात.परंतु प्रशासनाने ग्रामीण भागातील प्रवाशांची दैनिक पासची सुविधा बंद करून फक्त पुणे शहर कार्यक्षेत्रात पासची सुविधा चालू ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे, पासची सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील प्रवासी करीत आहेत.

बसच्या खात्रीशीर सुविधेमुळे पुणे शहरात दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा लोंढा वाढत आहे. त्यातून ‘पीएमपी’ प्रशासनाला मोठा आर्थिक फायदा होतो. पूर्वी सर्व मार्गांवरील बस प्रवाशांना ७० रुपये पासची सुविधा करण्यात आली होती. पास सुविधेला प्रवाशांनी प्रचंड चांगला प्रतिसाद दिला होता.

आता तळेगाव ढमढेरे येथून बसने पुणे येथे प्रवास करायचा असेल, तर जागेपासून वाघोलीपर्यंत पासऐवजी रोख पैसे देऊन तिकीट काढावे लागत असून, वाघोलीपासून पुढे पुण्यात जाण्यासाठी त्याच बसमध्ये पास घेऊन पुढील प्रवास करावा लागत आहे. जागेपासून पासची सुविधा बंद झाल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, व्यापारी व इतर सर्व सामान्य प्रवासी यांची गैरसोय होऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

७० ऐवजी आणखी जादा दर वाढून ‘पीएमपी’च्या प्रशासनाने प्रवाशांची पूर्वीप्रमाणेच पासची सुविधा उपलब्ध करावी अशी मागणी तळेगाव ढमढेरे येथील रहिवासी सुरेंद्र सातपुते व गोकूळ ढमढेरे तसेच दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी केली आहे.
-------------