
तळेगाव ढमढेरे येथे चार दिवसांपासून पाणीपुरवठा बंद
तळेगाव ढमढेरे, ता.१२ : तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथील नळ पाणीपुरवठा योजना गेल्या चार दिवसापासून बंद असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी गावठाणातील नागरिकांनी केली आहे.
तळेगाव ढमढेरे गावासाठी भीमा नदीवरून पाणीपुरवठा योजना राबविली असून, गेले चार दिवसापासून पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोठ्या लोकसंख्येच्या गावात तांत्रिक घोटाळ्यामुळे वारंवार पाणीपुरवठा बंद होतो, त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होतात. पाणीपुरवठा योजना त्वरित सुरू करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
दरम्यान, तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीची नळ पाणीपुरवठा योजनेची इलेक्ट्रिक मोटार जळाल्याने पाणीपुरवठा बंद असून मोटार तातडीने दुरुस्त करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ व ग्रामविकास अधिकारी बापूसाहेब गोरे यांनी दिली.