तळेगाव ढमढेरे ः विद्यार्थ्यांनी शोधलेल्या लघुग्रहाची प्रोव्हिजनल यादीत नोंद लघुग्रह ‘२०२२ बी. व्ही. ३९’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव ढमढेरे ः विद्यार्थ्यांनी शोधलेल्या लघुग्रहाची प्रोव्हिजनल यादीत नोंद
लघुग्रह ‘२०२२ बी. व्ही. ३९’
तळेगाव ढमढेरे ः विद्यार्थ्यांनी शोधलेल्या लघुग्रहाची प्रोव्हिजनल यादीत नोंद लघुग्रह ‘२०२२ बी. व्ही. ३९’

तळेगाव ढमढेरे ः विद्यार्थ्यांनी शोधलेल्या लघुग्रहाची प्रोव्हिजनल यादीत नोंद लघुग्रह ‘२०२२ बी. व्ही. ३९’

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता. १५ : आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ ने आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहीम सुरु केली आहे. त्याअंतर्गत तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील कुमार जयसिंगराव ढमढेरे जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मधील विद्यार्थांनी ग्लोबल मिशन ॲस्ट्रोनॉमी अँड रिसर्च सेंटरच्या विशाल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन शोधलेल्या लघुग्रहाची प्रोव्हिजनल यादीत निवड झाली आहे. या नवीन शोधलेल्या लघुग्रहाला २०२२ बी. व्ही. ३९ असे नाव देण्यात आले आहे.
लघुग्रह शोध मोहीम २८ जानेवारी ते २२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत राबविली होती. त्यासाठी लागणारी निरीक्षणे अमेरिकेच्या हवाई बेटावरील पॅन स्टार्स टेलिस्कोपमधून घेतली होती. या मोहिमेत ओम ढमढेरे, सूरज जवळे, सोहम पंडित, निरंजन केदारी, चैतन्य गोरे, तन्मय ढवळे या विद्यार्थी निरीक्षकांचा सहभाग आहे. विद्यार्थ्यांकडून विज्ञान प्रकल्प करून त्यांच्या संशोधन वृत्तीला चालना देण्यासाठी शिक्षिका माधुरी शेजवळ यांनी विशेष प्रयत्न केले. या उपक्रमाला मुख्याध्यापक जयवंत भुजबळ व शाळा व्यवस्थापन समितीने प्रोत्साहन दिले. नासाने सुरु केलेल्या लघुग्रह शोध मोहिमेत मंगळ व गुरू या ग्रहांमध्ये असलेल्या लघुग्रहांच्या पट्यातील लघुग्रह शोधण्याचे विशेष कार्य होते. निरीक्षणातील एका लघुग्रहाची प्रोव्हिजनल यादीत निवड झाल्याच्या टप्यानंतर लघुग्रहाचे व त्याच्या हालचालींचे निरीक्षण करून त्याची सत्यता पडताळून त्याचे नामकरण केले जाणार आहे. या प्रक्रियेसाठी साधारण ५ ते ७ वर्षांचा कालावधी लागतो.

मंगळ व गुरू ग्रहांमधील लघुग्रहांच्या पट्यातील लघुग्रह हे सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. प्रत्येक लघुग्रहाची परीभ्रमनाची वेळ व गती सारखी नसते, त्यामुळे ते एकमेकांवर आदळून त्यांचा मार्ग बदलू शकतात. असे लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येण्याची व पृथ्वीवरती आदळण्याची शक्यता असते. म्हणून लघुग्रहांचे सतत निरीक्षण करणे व त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच, लघुग्रहांच्या अभ्यासातून ग्रहांची व सूर्यमालेची निर्मिती कशी झाली? पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या निर्मितीमध्ये त्यांचे योगदान आहे का? अशा रहस्याचा उलगडा लघुग्रहांच्या निरीक्षण व संशोधनातून करता येतो, असे विशाल कुंभारे यांनी सांगितले.

लघुग्रह शोध मोहीम शालेय विद्यार्थ्यांमध्ये राबवून त्यांच्यातील अवकाश संशोधनवृत्तीला चालना देण्याचा प्रयत्न ग्लोबल मिशन ॲस्ट्रोनॉमी अँड रिसर्च सेंटर करत असते.
- विशाल कुंभारे, ग्लोबल मिशन ॲस्ट्रोनॉमी अँड रिसर्च सेंटर