तळेगावकरांचा शेतीपूरक व्यवसायात जम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगावकरांचा शेतीपूरक व्यवसायात जम
तळेगावकरांचा शेतीपूरक व्यवसायात जम

तळेगावकरांचा शेतीपूरक व्यवसायात जम

sakal_logo
By

तळेगावकरांचा शेतीपूरक व्यवसायात जम

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील युवकांनी शेतीपूरक व लहान मोठ्या व्यवसायात जम बसविला आहे. येथील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे स्मारक प्रेरणादायी असून, विविध पुरातन व आकर्षक मंदिरे गावचे वैभव आहेत.

- नागनाथ शिंगाडे, तळेगाव ढमढेरे

शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावाला ऐतिहासिक, धार्मिक व समाजसुधारकांच्या पुरोगामी विचारांची परंपरा लाभली आहे. पुण्यापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर मोठ्या लोकसंख्येचे गाव म्हणून तळेगावची ओळख आहे. पुरातन काळातील शेकडो आकर्षक मंदिरे येथे असल्याने गावाला ‘प्रति काशी’ची उपमा दिली जाते. सरदार जयसिंगराव ढमढेरे, सरदार बाबाजी ढमढेरे, नानासाहेब फडणीस, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे आदी शूर वीरांची ही ऐतिहासिक भूमी असून, समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली आहे. तसेच, त्यांनी सुरू केलेली मुलींची शाळा येथे आहे.
पूर्वी गावाला चारही बाजूने तटबंदी होती. येथील सरकारवाडा, पिंगळेवाडा, हनुमान मंदिरासमोरील वेस अद्यापही इतिहासाची साक्ष देत आहे. गावात पुरातन गणपती मंदिर, शंभू महादेवाची सात चिरंतन मंदिरे, चार संजीवनी समाधी, श्री समर्थ धुंडीनाथ महाराज मठ, देवपुरी मठ, दर्गा तसेच श्रीनाथ मंदिर, भैरवनाथ मंदिर, जामा मशीद, जैन मंदिर, दुर्गादेवी मंदिर, श्री खंडोबा मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, श्रीराम मंदिर, दत्त मंदिर, लक्ष्मीदेवी मंदिर, कानिफनाथ मंदिर, बुद्ध विहार आदी श्रद्धास्थाने आहेत. याशिवाय गावठाणासह वाड्या-वस्त्यांवर शेकडो मंदिरे आहेत. पूर्वीपासून येथे हनुमान उत्सव, भैरवनाथ उत्सव, श्रीनाथ उत्सव, श्री खंडोबा उत्सव, महाशिवरात्री आदी उत्सव व विविध धर्मांचे सण साजरे केले जातात. यावेळी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या भूमीला नाथांची पंढरी म्हणूनही संबोधले जाते.

विविध क्षेत्रांत प्रगती
गावात राजकीय पुढाऱ्यांचे वलय असून, महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी अनेकांना मिळाली आहे. ‘पुढाऱ्यांचे गाव’ म्हणूनही ओळख असल्याने देश, राज्य व जिल्हा पातळीवरील नेत्यांनी या गावाला वेळोवेळी भेटी दिल्या आहेत. गावात विविध जाती, धर्म व पंथाचे लोक गुण्या गोविंदाने वास्तव्य करतात. गावात स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, पुरोगामी विचारांचे आणि कला व साहित्य क्षेत्रातील विचारवंत, कायदे तज्ज्ञ, प्रगतिशील शेतकरी, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, नोकरदार, दुग्ध व्यावसायिक, कारखानदार, मजूर, महिला व पुरुष बचत गट, महिला मंडळे, विविध तरुण मंडळे, भजनी मंडळे, गणेश मंडळे व प्रतिष्ठाने तसेच बैलगाडा शौकीन, कराटेपटू, गिरीप्रेमी, क्रिकेटप्रेमी आदींची संख्या मोठी आहे. गावची सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, शेतीपूरक व्यवसाय आदी क्षेत्रात प्रगती झाली आहे.

व्यापारी गाव म्हणूनही ओळख
तळेगाव येथील बाजारपेठ मोठी असून, व्यापारी गाव म्हणूनही वेगळी ओळख आहे. गावात कृषी उत्पन्न बाजार समितीचा महात्मा फुले उपबाजार, आठवडा बाजार, ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय धान्य गोदाम, दुय्यम निबंधक कार्यालय, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, पतसंस्था, पोस्ट ऑफिस, पोलिस दूरक्षेत्र, महावितरण, प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, बँका, गृहप्रकल्प, मंगल कार्यालये, पदवीपर्यंत शिक्षण, विविध शिक्षणसंस्था आदींमुळे गावच्या वैभवात भर पडली आहे. गावातून बेल्हे-जेजुरी, शिक्रापूर-न्हावरे, नगर-पुणे, नगर-चाकण आदी महत्वाकांक्षी रस्ते जात असल्यामुळे वाहतूक व रहदारीचे जाळे निर्माण झाले आहे. पुण्याहून तळेगाव ढमढेरे येथे पीएमपीएमएलच्या बस सेवेची सुविधा उपलब्ध आहे.

नागरीकरणात वाढ
गावाला ४ हजार ३०६ हेक्‍टर इतके भौगोलिक क्षेत्र लाभले असून, गावाच्या दोन्ही बाजूने वेळ नदी व भीमा नदीच्या कुशीत हिरवा शालू पांघरलेली बागायती शेती असून, हा परिसर येथील शेतकरी वर्गाचा विकासाचा आर्थिक कणा बनला आहे. शिक्षण क्षेत्रात गावाने उत्कृष्ट प्रगती केली आहे. येथील विविध शाळांतील शालेय विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय, जिल्हा व तालुका पातळीवर विशेष
नैपुण्य मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले आहे. अलीकडील काळात गावांमध्ये औद्योगीकरण वाढल्याने कामगारांची संख्या मोठी असून, नागरीकरणात वाढ झाली आहे.

गावच्या विकासाचा ध्यास
गावच्या विकासासाठी आतापर्यंतचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, सरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ आदींनी प्रयत्न केले आहेत. अशा या विविध अंगांनी नटलेल्या गावाची ओळख तालुक्यासह जिल्ह्यात आहे. गावात विविध राजकीय गट असले; तरी सार्वजनिक कामांसाठी ग्रामस्थ नेहमी एकत्र येतात. गावच्या विकासासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध असून, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून व विविध सरकारी योजनेतून आणखी विकास कामे करण्याचा प्रयत्न असल्याचे गावचे पुढारी सांगत आहेत.