
भुजबळ विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
तळेगाव ढमढेरे, ता. ४ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील समाजभूषण संभाजीराव भुजबळ विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त नृत्य, विविध गुणदर्शन आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा पार पडल्याची माहिती मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी दिली.
समाजभूषण संभाजीराव भुजबळ यांच्या ३२ व्या स्मृतिदिनानिमित्त वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन चित्रपट लेखक व दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव भुजबळ, अध्यक्षा मंगल भुजबळ यांच्या हस्ते झाले.
या वेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गणेश वंदना, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावरील गीते, लोकगीते, चित्रपट गीते व हुंडाबळी, शेतकरी आत्महत्या, बैलगाडा शर्यतीचे तरुणावरील परिणाम, पर्यावरण रक्षण आदी सामाजिक विषयावरील नृत्य व नाटकाद्वारे जनजागृती केली. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये १५६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी संभाजी गवारे, भाजपचे धर्मेंद्र खांडरे, भगवानराव शेळके, भाजपचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, संदीप ढमढेरे, डॉ. राजेंद्र ढमढेरे, तुकाराम बेनके, राजेंद्र भुजबळ, अरुण भुजबळ, संभाजी भुजबळ पतसंस्थेचे अध्यक्ष राजाराम शिंदे, रमेश भुजबळ उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. गणेश मुंजावडे यांनी तर आभार किरण झुरंगे यांनी मानले.