तळेगाव ढमढेरे परिसरातील शेतकऱ्यांत नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेगाव ढमढेरे परिसरातील शेतकऱ्यांत नाराजी
तळेगाव ढमढेरे परिसरातील शेतकऱ्यांत नाराजी

तळेगाव ढमढेरे परिसरातील शेतकऱ्यांत नाराजी

sakal_logo
By

तळेगाव ढमढेरे, ता.८ : ''''केंद्र व राज्य सरकारकडून तब्बल एक वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप पीककर्जाच्या व्याजाचे पैसे मिळाले नसल्याने तळेगाव ढमढेरे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे,'''' अशी माहिती शेतकरी संघटनेचे पदाधिकारी श्रीकांत ढमढेरे यांनी दिली.

यावेळी ढमढेरे म्हणाले की, शासनाचे शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने पीककर्ज देण्याचे धोरण आहे. परंतु मार्च २०२२ अखेरीस केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांकडून मुद्दलासह प्रत्येकी ३ टक्के असे एकूण ६% रक्कम व्याजासहित वसूल केली होती. तब्बल एक वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारकडून व्याजाचा परतावा न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकरी व्याजाचे पैसे मिळवण्यासाठी वारंवार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमध्ये हेलपाटे मारुन विचारणा करीत आहेत. त्यातच आता पुन्हा व्याजासहित पीककर्ज भरावे लागत असल्याने शेतकरी हैराण झाले असून नाराजी पसरली आहे.

राज्य व केंद्र सरकार आधीच व्याज भरत होते, परंतु आता त्यांनी व्याज न भरल्यामुळे शेतकऱ्यांकडून गेल्या मार्च अखेरीपर्यंत पीककर्जाच्या मुद्दलासह ६ टक्के व्याजासह रक्कम विविध कार्यकारी संस्थानी वसूल करण्यास सुरुवात केली आहे. फक्त मुद्दल वसूल केल्यास शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. शेतकरी उसनवार रक्कम घेऊन पीककर्ज वेळेत भरून नव- जुनं प्रकरण करत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच वेळेत राज्य व केंद्र सरकारने व्याज भरून शेतकऱ्यांची हेळसांड थांबवून धीर द्यावा, अशी मागणी ढमढेरे यांनी केली आहे.