
धानोरे येथील विजय माशिरे यांनी घेतले उसात सहा टन काकडीचे आंतरपीक
तळेगाव ढमढेरे, ता.११: धानोरे (ता.शिरूर) येथील युवा शेतकरी विजय माशिरे यांनी अर्धा एकर खोडवा उसात काकडीचे आंतरपीक घेऊन सहा टनाचे उत्पादन घेतले आहे. काकडीसाठी युनायटेड सीड्स कंपनीच्या शिवालीका या वाणाची निवड करून, खत व्यवस्थापन केले. किडीपासून बचावासाठी जैविक खते व जैविक कीटकनाशके वापरली आहेत. विठ्ठलवाडी येथील भैरवनाथ कृषी सेवा केंद्राचे संचालक मंगेश मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जैविक उत्पादने वापरून काकडीचे यशस्वी आंतरपीक घेण्यात माशिरे यांना यश आले आहे.
काकडीची विक्री शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप येथील उपबाजारात केली आहे. खर्च वजा जाऊन काकडीचे चांगले उत्पन्न मिळाले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे बाजारात काकडीला मागणी जास्त आहे.
दरम्यान, प्रत्येक शेतकऱ्याने उसामध्ये आंतरपीक घेऊन उसाचा पर्ण वर्षभरात होणारा खर्च आंतरपिकातून मिळवला तरच ऊस शेती फायदेशीर ठरेल, असे मत माशिरे यांनी व्यक्त केले.
04549