
तळेगाव येथील तलावातील गाळ काढण्यास सुरुवात
तळेगाव ढमढेरे, ता. ३० : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील सुमारे १४ एकर क्षेत्रातील शासकीय पाझर तलाव (लांडे वस्ती) आणि तांबूळ ओढा पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला.
शासनाच्या गाळमुक्त धोरणांतर्गत येथील पाझर तलावातील गाळ मृद व जलसंधारण विभाग महाराष्ट्र शासन आणि बेसिक इनिशिएटिव्हज फॉर रिसोर्स डेव्हलपमेंट (बर्ड) फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात येत आहे.
यावेळी आमदार अशोक पवार म्हणाले, ‘‘शासनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांनी राबविलेली ही योजना अतिशय चांगली असून ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे. या योजने अंतर्गत दोन्ही तलावातील तीस हजार घन मीटर इतका गाळ काढण्यात येणार असून, हा गाळ शेतकऱ्याने स्वखर्चाने आपल्या शेतामध्ये टाकायचा आहे. यामध्ये अल्पभूधारक (एक हेक्टर पेक्षा कमी) शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये एकरी अनुदान मिळणार आहे. या योजनेमुळे पाझर तलावातील पाणीसाठा वाढण्यात मदत होणार असून, शेतकऱ्याच्या जमिनी सुपीक होऊन जमिनीचा पोत वाढणार आहे. परिणामी उत्पादनात भरघोस वाढ होणार आहे. तसेच गाळ काढल्यामुळे पाझर तलावाच्या पाणी साठ्यात वाढ होऊन परिसरातील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
‘‘जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तलावातील गाळ नेऊन आपल्या शेतात टाकावा व तलाव गाळमुक्त करावा, असे आवाहन आमदार पवार यांनी यावेळी केले.’’
यावेळी शिरूरचे मृद व जलसंधारण उपविभागाचे उपअभियंता सुयश महाडीक, कनिष्ठ अभियंता विक्रम देशमुख, बर्ड संस्थेचे सचिव पवन रायकर, प्रकल्प व्यवस्थापक संदीप खामकर व शरद गारूडकर यांनी शासनाच्या गाळमुक्त तलाव योजनेची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना उदाहरणे देऊन सांगितली.
यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, बाजार समितीचे माजी उपसभापती विश्वास ढमढेरे, संचालक ॲड. सुदीप गुंदेचा, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच राहुल भुजबळ, माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे, ग्रामपंचायत सदस्य स्वाती लांडे, माजी ग्रामपंचायत सदस्य मोहन भुजबळ, राज्य ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब लांडे, उद्योजक सचिन लांडे, निवृत्ती जकाते, गणेश भुजबळ, पंढरीनाथ राऊत, सत्यवान भुजबळ, अमोल भुजबळ आदी उपस्थित होते.