
तरुणांनी ज्येष्ठांच्या विचारातून जीवनाची दिशा ठरवावी ः पवार तळेगाव ढमढेरे येथे प्रथमच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार
तळेगाव ढमढेरे, ता. २ : ‘‘ज्येष्ठांच्या विचारांची व मार्गदर्शनाची दखल तरुण पिढीने घेऊन आपल्या जीवनाची दिशा ठरवावी. गावाच्या विकासासाठी तात्पुरते मतभेद सोडून एकत्रित येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, ज्या गावात ज्येष्ठांची संख्या जास्त तेथे एकोपा व सामंजस्याची कदर केली जाते. चासकमानचे पाणी सर्वांनाच मिळेल, यासाठी नेहमीच प्रयत्न केले. आगामी काळातही कोणावर अन्याय होणार नाही, अशा प्रकारची भूमिका प्रशासनाला घेण्यास भाग पाडणार आहे.’’ असे मत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभात आमदार पवार बोलत होते. येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरामध्ये गावातील ६५ वर्ष वयापुढील ३० स्त्री व पुरुष ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आमदार अशोक पवार यांच्या हस्ते झाला.
दिवंगत समाजभूषण किसन भुजबळ विचारमंच, भैरवनाथ (मुळोबा) देवस्थान ट्रस्ट, भैरवनाथ (मुळोबा) उत्सव मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे प्रथमच आयोजन केले होते. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट भुजबळ, पंचायत समितीच्या माजी सभापती आरती भुजबळ, माजी उपसरपंच विजय ढमढेरे आदींनी मनोगत व्यक्त केले.
भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश भुजबळ, जिल्हा दूध संघाचे संचालक ॲड. स्वप्निल ढमढेरे, बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, घोडगंगा कारखान्याचे संचालक विश्वास ढमढेरे, सरपंच अंकिता भुजबळ, उपसरपंच राहुल भुजबळ, नवनाथ ढमढेरे, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष बाळासाहेब लांडे, ॲड. सुदीप गुंदेचा, युवा नेते राहुल करपे, रेश्मा गायकवाड, पोलिस पाटील पांडुरंग नरके, तुकाराम गायकवाड, समता परिषदेचे लक्ष्मण नरके, ॲड. संपत ढमढेरे, योगेश ढमढेरे, शहाजी ढमढेरे, सुनील ढमढेरे, बापू भुजबळ, रामभाऊ ढमढेरे विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. तुकाराम गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. निवृत्ती जकाते यांनी आभार मानले.