
संगणकीय वजन काटा शेतकऱ्यांसाठी वरदान
तळेगाव ढमढेरे, ता.७ : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले उपबाजारातील ५० टनी संगणकीय वजन काटा शेतकरी व व्यापाऱ्यांना विश्वासपात्र व वरदान ठरला आहे. आत्तापर्यंत वजनकाट्यापासून सुमारे ७५ लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव अनिल ढोकले आणि सहसचिव अनिल ढमढेरे यांनी दिली.
तत्कालीन सभापती प्रकाश पवार व उपसभापती ॲड. यशवंत ढमढेरे आणि संचालक मंडळ यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून ७ ऑगस्ट २००८ मध्ये वजन काट्याची सुरुवात करण्यात आली. येत्या ऑगस्टमध्ये येथील वजन काटा स्थापनेला पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. यापूर्वी परिसरातील शेतकरी, मालवाहतूकदार, व्यापारी तसेच उद्योजकांना आपल्या मालाचे वजन करण्यासाठी सणसवाडी व इतरत्र वजन काट्यासाठी जावे लागत होते. शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचे सहज वजन करण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे वजन काटा असावा अशी संकल्पना सभापती प्रकाश पवार यांनी मांडली, सर्वानुमते येथील उप बाजारात वजनकाट्याची स्थापना करण्यात आली.
सुरुवातीपासूनच येथील वजनकाटा संगणकीकृत असून खात्रीशीर वजन करण्यासाठी येथील वजनकाट्यावर शेतकरी गर्दी करत आहेत. येथील वजनकाट्याची माफक फी असून सर्व वजन कागदावर संगणकाद्वारे दिले जाते. तसेच येथील वजनकाट्याची २४ तास सेवा दिली जाते.
खात्रीशीर व विश्वासास पात्र वजनकाटा म्हणून शेतकरी, व्यापारी तसेच वाहतूकदार येथील वजनकाट्याला प्राधान्य देत आहेत. ऊस तोडणीच्या काळात व्यापारी शेतकऱ्यांकडून गुऱ्हाळासाठी ऊस नेतात त्याचे वजन येथील काट्यावरच केले जाते. येथील कर्मचारी वजन काट्यावर अहोरात्र सेवा करून बाजार समितीला चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवून देत आहेत.
04768