बिबट्याला थेट ‘शूट आउट’ करा

बिबट्याला थेट ‘शूट आउट’ करा

Published on

टाकळी हाजी, ता. १२ : ‘‘बिबट्यापेक्षा माणसाचा जीव महत्त्वाचा आहे. यापुढे एकही जीव बिबट्याच्या हल्ल्यात जाणार नाही. या भागातून बिबट्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांना जेरबंद, नसबंदी तसेच वनतारा येथे स्थलांतरित करण्यात येईल. माणसावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला थेट ‘शूट आउट’ करा,’’ असे मत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केले. दरम्‍यान, बिबट्याला ‘शूट आउट’ करा, असा लेखी आदेश नसल्याने केवळ भावनेच्या भरात वनमंत्री बोलून गेले की काय, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
पिंपरखेड (ता. शिरूर) येथे वनमंत्री नाईक यांनी भेट देऊन बिबट्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेले शिवन्या बोंबे, भागूबाई थोरात आणि रोहन बोंबे यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले, त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘या परिसरात असणाऱ्या सर्व बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पकडलेला एकही बिबट्या पुन्हा या भागात सोडला जाणार नाही; त्याला गुजरातमधील वनतारा येथे स्थलांतरित केले जाईल. तसेच ज्या देशात बिबट्यांची कमतरता आहे, अशा आफ्रिकन देशांमध्ये हे बिबटे पाठवण्याचा प्रयत्न केला जाईल.’’

‘ते’ गुन्हे मागे घेण्यात येतील
गावकऱ्यांनी जे रस्ता रोको केले, वनखात्याची वाहने जाळली, ती एक नैसर्गिक प्रतिक्रिया होती. त्यामुळे त्या प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यात येतील. तसेच पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. योग्यवेळी नियंत्रण न आणल्यास मानवी जीव धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे राज्य शासनाकडून केंद्र सरकारकडे परवानगी मागवून ठोस निर्णय घेतले जातील, तसेच बिबट्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या कुटुंबातील सदस्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही वनमंत्री नाईक यांनी स्पष्ट केले.

भावनिक क्षण
रोहन आणि शिवन्या यांच्या आई–वडिलांनी आपल्या पोरांना डोळ्यांसमोर बिबट्याने मारल्याची करुण कहाणी सांगितली. त्यांच्या या वेदनादायक कथनाने वनमंत्री गणेश नाईकही गहिवरले. काही क्षण तेही स्तब्ध झाले. ‘‘मी एक तुमच्यातलाच आहे, मलाही भावना आहेत. यापुढे असे निष्पाप बळी जाणार नाहीत,’’ असे म्हणत वनमंत्री नाईक यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

00804

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com