फेसाळली मुळा- मुठा...फोफावली जलपर्णी
थेऊर, ता. ७ : पुणे शहरातून दौंडकडे जाणाऱ्या मुळा- मुठा नदीचे पाणी लोणी काळभोर (ता. हवेली) येथील बंधारा परिसरात फेसाळले आहे. त्यामुळे जलपर्णी फोफावली, तर फळभाज्या, पालेभाज्या दूषित झाल्याने सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच, परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
मुळा- मुठा नदीच्या पाण्यातील प्रदूषणावर उपाय योजना होत नाहीच. पण दिवसेंदिवस पाण्याची गुणवत्ता आणखी खराब होत असून, नदी अतिप्रदुषित झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील विश्वराज बंधाऱ्याजवळ पाण्यावर फेसाचा सुमारे एक ते दीड फूट तवंग तरंगताना दिसून येत आहे.
कोणत्याही शहरातून वाहणारी नदी ही केवळ या शहराची जीवनवाहिनी नाही, तर आरोग्याचे रक्षण करणारी सरिता समजली जाते. पण मुळा-मुठा नदीचे गटारगंगेत झालेले रूपांतर हे पुणे व नदी नजीकच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याबाबतच्या वाढत्या तक्रारीमागे एक महत्त्वाचे कारण आहे. या नदीकडे गेल्या पाच ते सहा दशकांत दुर्लक्ष झाले असल्यामुळे तिची व तिच्या आसपासची परिस्थिती भयावह झाली आहे.
पानशेत येथील पुराला तेथे झालेली अतिक्रमणे हे त्यातले एक महत्त्वाचे कारण आहेच. पण त्याबरोबरच या नदीत शहरातील ठिकठिकाणांहून येणारे मैलायुक्त पाणी शिरल्यामुळे नदीतील जलसृष्टीच धोक्यात आली आहे. पुणे शहराला जास्त पाण्याची आवश्यकता होती, त्यावेळी खडकवासला धरणातून पाणी घेतल्यानंतर तयार झालेले सांडपाणी प्रक्रिया करून ते जुन्या कालव्याद्वारे शेतीस पुरवावे, अशी अट घातली होती. हा करार वर्ष १९९७मध्ये झाला. गरजेएवढे पाणी उचलले गेले. मुंढवा येथे पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी कालव्यात सोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जॅकवेल प्रकल्पाची उभारणीही केली, परंतु नदीतील पाण्यावर येत असलेला फेस पाहता कोणी कसलाही दावा केला तरी आज अखेर १०० टक्के पाण्यावर प्रक्रिया करणे पुणे महानगरपालिकेस शक्य झालेले नाही हे वास्तव आहे.
सांडपाणी जसेच्या तसेच नदीत
शेतीसाठी देण्यात येणारे पाणी नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे सोडण्यात येते. खडकवासला धरणांतून पावसाळ्यात अतिरिक्त झालेले पाणी वगळता एक थेंब देखील पाणी नदीपात्रात सोडला जात नाही. नेमक्या याच स्थितीचा फायदा घेऊन वर्षातील सुमारे आठ महिने सांडपाणी, मैलाजल व कारखान्यातून बाहेर पडणारे मानवी जीवितास घातक ठरणारे रसायनयुक्त पाणी पुणे व पिंपरी- चिंचवड महानगरपालिका त्यांवर कसलीही प्रक्रीया न करता जसेच्या तसे नदीपात्रात सोडून देते व निर्धास्त होते. याबरोबर पुणे, पिंपरी-चिंचवड सह नदीतीरावर असलेल्या अनेक गावांतील हजारों टन कचराही येथेच रिचवला जातो. परिणामी हे दौड, बारामती आणि उजनीचे पाणी थेट सोलापूरपर्यंत जात असल्याने नदीतीरावरील रहिवासी आणि सोलापूरच्या नागरिकांना सक्तीने रसायनयुक्त दूषित पाणी पिऊन अनेक पोटांच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.
कारवाईकडे दुर्लक्ष
शेतीला दूषित पाणी मिळत असल्याने फळभाज्या, पालेभाज्या उत्पादनावरही त्याचा मोठा परिणाम होत आहे. नदीचे पाणी खराब करणाऱ्यांवर कडक कारवाई होत नाही हे वास्तव आहे. याकडे महापालिका, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे नदी काठच्या परिसराची पाहणी करून कुठलीही ठोस कारवाई न केल्याने नदी फेसाळू लागल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी करत आहेत.
सध्या मुंढवा येथील जलशुद्धीकरण केंद्रातून ४५० एमएलडी सांडपाणी शुद्ध केले जाते, म्हणजेच ५० टक्केच सांडपाणी शुद्ध केले जाते. इतर सांडपाणी सरळ नदीमधून वाहिले जाते. भविष्यात जलशुद्धीकरणाच्या क्षमता वाढ प्रकल्पाचे काम चालू आहे. त्यापैकी १०० एमएलडी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तीन महिन्यात कार्यान्वित होईल व ३५० एमएलडी सांडपाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प सहा महिन्यात कार्यान्वित होईल. त्यानंतर सुमारे ९०० एमएलडी सांडपाणी शुद्धीकरण केले जाईल.
- मनीषा शेकटकर, मुख्य अभियंता, विद्युत विभाग, महानगरपालिका
00455
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

