
रांजणगाव येथे रस्त्याचे काम संथगतीने
रांजणगाव गणपती, ता. २ : शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरातील अष्टविनायक रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून पावसामुळे या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यापुर्वी ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र अधिकारी व ठेकेदाराचे होत असलेल्या दुर्लक्षाने प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तत्काळ या रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रांजणगाव ग्रामस्थांनी दिला असल्याची माहिती आंबेगाव शिरूर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिली.
पाचुंदकर म्हणाले, शिरूर तालुक्यातील कवठे येमाई-मलठण-सोनेसांगवी ते रांजणगाव गणपती या अष्टविनायक रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोरोना काळात या रस्त्यावरील कामांसाठी निधी उपलब्ध झाला नव्हता. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा करून या अष्टविनायक रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. कोट्यवधीचा निधी उपलब्ध झाला तरी बहुतेक ठिकाणी या रस्त्यावरील कामे अपूर्ण ठेवण्यात आली आहेत. काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी साईडपट्टी तयार करण्याचे काम अपूर्ण आहेत.
बहुतेक गावांच्या ठिकाणी कामे बंद अवस्थेत आहेत. रांजणगाव गणपती येथील लांडे वस्तीजवळ पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी या ठिकाणी कोणतेही फलक लावण्यात आले नाहीत. येथील पुलाचे काम थांबले आहे. शेळके मळ्यात देखील काम सुरू करण्यात आले असून पुन्हा काम बंद झाले आहे. यासाठी दत्तात्रेय पाचुंदकर, भास्कर लांडे, प्रकाश लांडे, माणिक लांडे, दत्ता लांडे, उत्तम थोरात, रमेश खेडकर, विजय गलांडे, सुभाष लांडे, बाळासाहेब पवार यांनी पावसाळ्यापूर्वी रस्त्याची कामे पूर्ण करावीत या बाबत निवेदन दिले आहे.
अष्टविनायक रस्त्याचे काम सुरू आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्याला कामाची चौकशी करण्यास सांगितले जाईल.
सत्यशील नगराळे, वरिष्ठ अभियंता
Web Title: Todays Latest District Marathi News Tkh22b01746 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..