हुंदाईकडून जनरल मोटर्स प्रकल्प अधिग्रहणाच्या हालचाली

हुंदाईकडून जनरल मोटर्स प्रकल्प अधिग्रहणाच्या हालचाली

गणेश बोरुडे : सकाळ वृत्तसेवा
तळेगाव स्टेशन, ता.१५ : ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीने जनरल मोटर्स इंडिया प्रकल्पाच्या संभाव्य अधिग्रहणासाठी मुदत पत्रकावर (टर्म शीट) नुकतीच स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे तळेगाव एमआयडीसीमध्ये असलेल्या जनरल मोटर्सच्या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन होणार आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये रोजगारासह चार हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा मोठा ओघ येण्याची शक्यता आहे. कारण सध्या तीन वर्षांपासून उत्पादन बंद आहे.

भारत-चीनचे आंतरराष्ट्रीय संबंध ताणल्यानंतर चीनच्या ग्रेट वॉल मोटर्ससोबत झालेल्या प्रकल्प विकत घेण्याबाबतच्या वाटाघाटी गेल्यावर्षी फिसकटल्या होत्या. त्यानंतर आता कोरियातील अग्रणी वाहन उत्पादक हुंदाई मोटर्स कंपनी आणि अमेरिकेच्या जनरल मोटर्स व्यवस्थापनामध्ये जनरल मोटर्सचा वाहन उत्पादन प्रकल्प विकत घेण्याबाबत स्वारस्य दाखवून वाटाघाटी सुरू केल्या आहेत. ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीच्या अधिकृत पोर्टलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. मावळ तालुक्यातील तळेगाव एमआयडीसीमधील नवलाख उंबरे येथील सुमारे तीनशे एकरावर हा प्रकल्प आहे.

जनरल मोटर्स इंडिया प्रकल्पातील उत्पादन बंद झाल्यानंतर बेरोजगार झालेल्या जवळपास एक हजारहून अधिक कामगारांबाबत कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी जनरल मोटर्स इंडिया व्यवस्थापनाकडून अद्याप अपूर्णच असल्याने त्यांचे भवितव्य अद्यापही अधांतरीच आहे. त्यामुळे सध्यातरी याबाबत दोन्ही व्यवस्थापनात बंधनकारक नसलेला करार झाल्याचे कळते. या पार्श्वभूमीवर अधिग्रहण करार पूर्ण करण्यासाठी दोन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापनास अडचणींचा डोंगर पार करावा लागण्याची शक्यता आहे. जनरल मोटर्सचे भागधारक आणि महाराष्ट्र सरकारच्या परवानगी, मंजुरीसह बेरोजगार कामगारांच्या तडजोडीनंतर हुंदाईकडून अंतिम करारावर स्वाक्षरी केल्या जाण्याची शक्यता आहे. नियोजित मालमत्ता अधिग्रहण हे निश्चित मालमत्ता खरेदी कराराला अनुसरून असणार आहे.

ह्युंदाई मोटर इंडिया कंपनी भारतातील आपल्या आगामी पहिल्या सूक्ष्म एसयूव्ही ई-वाहन उत्पादनासह इतर निर्यात धोरणाच्या दृष्टीने तळेगाव स्थित जनरल मोटर्सचा अस्तित्वातील अत्याधुनिक आणि अद्ययावत प्रकल्पाची रचना विचारात घेऊन नियोजन करत आहे. विशेष म्हणजे ह्युंदाई मोटर इंडिया कंपनीने आपल्या मोक्याच्या पुरवठादारांना तळेगाव एमआयडीसी परिक्षेत्रात उत्पादन प्रकल्प उभारण्याकामी गुंतवणुकीसाठी तयार होण्याचे निर्देश दिल्याचीही चर्चा उद्योगविश्वात आहे.

वार्षिक एक लाख ८६ हजार वाहने निर्मिती क्षमता असलेल्या जनरल मोटर्सच्या प्रकल्प ह्युंदाई मोटर इंडियाने अधिग्रहीत केल्यास तळेगाव एमआयडीसी आणि पुणे जिल्ह्यातील वाहन निर्मिती उद्योग आणि संबंधित पुरवठादारांना प्रोत्साहक ठरणार आहे.

महाराष्ट्र सरकार आणि एमआयडीसी प्रशासनाने हुंदाई मोटर आणि जनरल मोटर्समधील अधिग्रहण करार यशस्वी करण्याकामी कसोशीने आणि सर्वतोपरी सहकार्य करायला हवे. हुंडाई मोटर्सच्या नियोजित प्रकल्पाचे आम्ही स्वागत करतो.
- रामदास काकडे, उद्योजक, तळेगाव दाभाडे


चौकट :
स्थानिक तरुणांकडून हुंदाईचे स्वागत
गतवर्षी फॉक्सकॉनचा मोठा नियोजित प्रकल्प गुजरातला गेल्याने गेले काही दिवस निराशेचे सावट असलेल्या मावळ तालुक्याचे भवितव्य संभाव्य हुंदाई प्रकल्पामुळे उज्वल होणार आहे. तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील जनरल मोटर्स कंपनी ह्युंदाई कंपनीकडून अधिग्रहीत होण्याच्या शक्यतेमुळे तळेगाव औद्योगिक क्षेत्राच्या परिघातील स्थानिक तरुणांमध्ये उल्हासाचे वातावरण तयार झाले आहे. याबाबत माहिती कळताच नवलाख उंबरे, आंबी, मंगरूळ, जाधववाडी, बधलवाडी, वारंगवाडीसहच्या गावकऱ्यांनी बुधवारी (ता.१५) ह्युंदाई कंपनीचा लोगो असलेला फलक जनरल मोटर्सच्या प्रवेशद्वारावर लावून फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. उद्योजक रणजित
काकडे, नवलाख उंबरेचे सरपंच रामनाथ बधाले, दिनकर शेटे, तानाजी पडवळ, संतोष नरवडे, नवनाथ पडवळ, संग्राम कदम, राजू कडलक, नागेश शिर्के, गुरुदेव घोलप, सतीश कदम, दत्तात्रेय कदम, गोरख शेटे आणि महिला मंडळ उपस्थित होते.

फोटो ओळी WA0033 :
तळेगाव एमआयडीसी : जनरल मोटर्स बंद प्रकल्पाच्या प्रवेशद्वारावर फलक लावून आनंद व्यक्त करताना स्थानिक तरुण  

जनरल मोटर्स आणि हुंदाई कंपनीचे लोगो

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com