ओतूर परिसरात पावसाने शेतमालाचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओतूर परिसरात पावसाने शेतमालाचे नुकसान
ओतूर परिसरात पावसाने शेतमालाचे नुकसान

ओतूर परिसरात पावसाने शेतमालाचे नुकसान

sakal_logo
By

ओतूर, ता. २१ : ओतूर (ता. जुन्नर) परिसरात शुक्रवारी पहाटे मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

चिल्हेवाडी धरण परिसरात ७९ मिलिमीटर पावसाची नोंद सकाळी झाली. तसेच रात्री पावसामुळे मांडवी नदीपात्रात २०५० क्युसेकने पाणी पडत होते. त्यामुळे मांडवी नदीला पूर आला. मात्र शुक्रवारी दिवसभर पाऊस कमी झाल्याने मांडवी नदीत दुपारपासून २००० क्युसेकने पाणी पडत होते. तर पिंपळगाव जोगा धरणक्षेत्रात सकाळी फक्त सहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पिंपळगाव जोगा धरणातून पुष्पावती नदीत एक हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढतो, अशी माहिती चिल्हेवाडी व पिंपळगाव जोगा धरणावरील सूत्रांनी दिली.

या पावसामुळे ओतूर, उदापूर, डिंगोरे, मांदारणे, कोपरे, मांडवे, मुथाळणे, पिंपळगाव जोगा, सांगणोरे, खिरेश्वर, खुबी, करंजाळे, मढ, पारगाव, सितेवाडी, वाटखळे, पांगरी तर्फे मढ, कोळवाडी, बल्लाळवाडी, नेतवड, माळवाडी, ठिकेकरवाडी, चिल्हेवाडी, पाचघर, आंबेगव्हाण, रोहोकडी, खामुंडी, डुंबरवाडी, धोलवड, पिंपरी पेंढार, गायमुखवाडी परिसरातील ओढे-नाले तुडूंब भरून वाहत असून, शेतातील पिकांचेही नुकसान झाले असून, परिसरात ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
यामुळे शेतातील टोमॅटो, मिरची, फ्लॉवर, कोबी, झेंडू, काकडी यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले असून, गेल्या पंधरा ते वीस दिवसांत टाकण्यात आलेली कांदा रोपे या पावसाने वाया गेली आहेत. तसेच सोयाबीनची गुणवत्ता खराब होऊन कित्येक ठिकाणी सोयाबीन सडले आहे. तरी शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.