विरभद्र देवाच्या यात्रेला पांगरीमध्ये भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विरभद्र देवाच्या यात्रेला
पांगरीमध्ये भाविकांची गर्दी
विरभद्र देवाच्या यात्रेला पांगरीमध्ये भाविकांची गर्दी

विरभद्र देवाच्या यात्रेला पांगरीमध्ये भाविकांची गर्दी

sakal_logo
By

ओतूर, ता. १ ः पांगरी तर्फे मढ (ता. जुन्नर) येथे चंपाषष्ठी निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम राबवून श्री विरभद्र देवाची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. त्यात वंशपरंपरेनुसार तप्त विस्तवावरून चालण्याची प्रथा भक्तांनी यावर्षीही कायम ठेवल्याची माहिती श्री विरभद्र नवतरुण मंडळाचे अध्यक्ष विलास दिघे व उपसरपंच श्रीकांत दिघे यांनी दिली.


यात्रा उत्सवाचे श्री विरभद्र देवस्थान ट्रस्ट, श्री विरभद्र नवतरुण मंडळ मुंबई, श्री विरभद्र नागरी सहकारी पतपेढी, श्री विरभद्र दूध उत्पादक संस्था, श्री विरभद्र प्रासादिक भजन मंडळ व समस्त ग्रामस्थ पांगरी तर्फे मढ यांनी नियोजन केले होते.

यावेळी यात्रेच्या निमित्ताने मांडव डहाळे, श्रींची प्रतिमा मिरवणूक, श्रींचा अभिषेक, पानफूल तसेच आलेल्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे स्वरांजली कला मंच पुणे निर्मित शाहीर गणेश वाघमारे प्रस्तुत ‘गौरव माझ्या महाराष्ट्राचा’ हा लोकप्रबोधनपर कार्यक्रम पार पडला.

या यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे भक्त तप्त विस्तवावरून पायी चालत देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात. या विस्तवावरून चालताना आजपर्यंत कुठल्याही भक्ताला थोडीशीही इजा झालेली नाही. या मंदिराच्याशेजारी दहा फूट चरी करून त्यात तापलेला विस्तव पांगवला जातो, तद्‍नंतर या विस्तावाचे भक्तांच्या हस्ते पूजन करून प्रथम गावातील भगत या विस्तवावरून चालत जातो, त्यांच्यामागे शेकडो भाविक या तप्त विस्तवावरून चालत मंदिराला प्रदक्षिणा मारून आपला भक्तिभाव व्यक्त करतात. यामुळे या विरभद्र देवस्थानची यात्रा परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरते.
-------------------------------
श्री विरभद्र देवाची मूर्ती