
पिंपळगाव जोगे येथील कृषिपंपांच्या तारांची चोरी
ओतूर, ता. ३ : पिंपळगाव जोगे (ता. जुन्नर) येथील पुष्पावती नदी तीरावरील तेरापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या केबल गुरुवारी (ता. १) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पळविल्या.
पिंपळगाव जोगे गावच्या दशक्रिया विधी घाट परिसरात पुष्पावती नदी तीरावर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात कृषिपंप आहेत. शुक्रवारी सकाळी शेतकरी कृषिपंप सुरू करण्यासाठी गेले असता केबल चोरीचा प्रकार उघडकीस आला. पिंपळगाव जोगा येथील शेतकरी व माजी उपसरपंच नवनाथ सुकाळे यांच्या चार मोटारीच्या केबल, सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेच्या दोन मोटारीची, गेणभाऊ सस्ते यांच्या दोन मोटारीची केबल व एक नॉन रिटर्न वॉल कापून नेला. तसेच, याच परिसरातील अजित घाडगे, आनंद हांडे, जगन कुमकर, दिलीप सुकाळे, सागर हांडे, कारभारी सुकाळे व इतर शेतकऱ्याच्या कृषिपंपाच्या केबल चोरट्यांनी कापून चोरून नेल्या. या आधी तीन ते चार दिवसांपूर्वी पिंपळगाव जोगे गावच्या हद्दीतील पुष्पावती नदी तीरावरील कोकणे वस्तीतील दहा मोटारीच्या केबल चोरट्यांनी कापून चोरून नेल्या. केबल चोरांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला.
या परिसरात कृषिपंपाच्या केबल चोराचा पोलिस प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच प्रदीप भांगे, उपसरपंच जितू सस्ते, माजी उपसरपंच नवनाथ सुकाळे, भगवान हांडे, दादासाहेब हांडे, पंकज हांडे, अशोक हांडे, सतीश हांडे, अमोल चौधरी, नीलेश हांडे, देवराम सुकाळे, बाळासाहेब हांडे यांनी व परिसरातील इतर शेतकऱ्यांनी केली आहे.