
बिबट्याच्या हल्ल्यात मेंढपाळ महिला जखमी
ओतूर, ता. २२ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील निमपोई येथे शेतात झोपलेल्या मेंढपाळ महिलेवर बिबट्याने हल्ला करून किरकोळ जखमी केल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.
सदर घटना मंगळवारी रात्री ११. ३० दरम्यान घडली. यात मंगल विजय सोडनर (वय २६) येथे शेतात ही मेंढपाळ महिला किरकोळ जखमी झाली.
ओतूर ब्राम्हणवाडा रोड निमपोई येथे शेतात मेंढ्या मुक्कामी (बसविलेल्या) असताना रात्री सोडनर कुटुंब झोपलेले असताना मंगल यांच्या डोक्याच्या शेजारी कुत्रे बसलेले होते. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केला असता कुत्रा पळून गेला. बिबट्याची झेप झोपलेल्या मंगल सोडनर यांच्या डोक्यावर बसली. त्यात त्या किरकोळ जखमी झाल्या. त्यानंतर सदर महिलेला ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. येथे डॉ. श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ओमकार डाळिंबे यांनी प्राथमिक उपचार करून महिलेला पुढील उपचारासाठी वनविभागाकडून नारायणगाव येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले.
ओतूरमधील निमपोई, इखळपट, गाढवेपट, फाफाळे शिवार या परिसरात वनविभागाने पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने विघ्नहरचे संचालक धनंजय डुंबरे यांनी केली.