
धोलवडच्या सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल
ओतूर, ता. २५ : धोलवड (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीचे सरपंच सुधाकर ज्ञानेश्वर नलावडे यांच्या विरोधात सात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला असून, त्यावर जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सोमवारी (ता. २७) विशेष सभा आयोजित केली आहे.
धोलवडचे सरपंच सुधाकर नलावडे हे ग्रामपंचायत सदस्यांना विविध कामाबद्दल चुकीची माहिती देतात, ग्रामस्थांना चुकीची माहिती पुरवतात, ग्रामपंचायत सदस्यांना दैनंदिन कारभारात विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, अशी कारणे देवून उपसरपंच सोमनाथ दत्तात्रेय नलावडे, सदस्य सुनीता कालिदास नलावडे, ऊर्मिला सुभाष मुंढे, सुनीता सुदाम नलावडे, मंगल जनार्दन नलावडे, पौर्णिमा संदीप भोर, वैभव अजित नलावडे यांनी तहसीलदारांकडे २० फेब्रुवारी रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर विचारविनिमय करण्यासाठी सदस्यांची विशेष सभा सोमवारी दुपारी ३ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदारांनी आयोजित केली आहे.