
शेतात झोपलेल्या महिलेवर ओतूरला बिबट्याचा हल्ला
ओतूर, ता. १५ : ओतूर (ता. जुन्नर) येथे बुधवारी पहाटे शेतात झोपलेल्या परप्रांतीय शेतमजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केला. त्यात महिला जखमी झाली आहे. रविता उकार किराडे (वय २०), असे या महिलेचे नाव आहे, अशी माहिती वनपरीक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.
ओतूर येथील उंब्रज पांध शिवारात कांदा उत्पादक शेतकरी भगवान महादेव तांबे यांच्या शेतात कांदा काढण्यासाठी आलेली मध्य प्रदेशातील शेतमजुरांची टोळी रात्री झोपली होती. बुधवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास शिकारीचा पाठलाग करत असताना बिबट्याने शिकारीवर झेप घेतली. मात्र, शिकार पळून गेली व बिबट्याची झेप झोपलेल्या महिलेवर पडली. बिबट्याचा पंजा महिलेच्या डोक्याला व हाताला लागून सदर महिला जबर जखमी झाली.
या घटनेची माहिती मिळताच वनपाल सुधाकर गिते, वनरक्षक पी. के. खोकले, वनसेवक किसन केदार व साहेबराव पारधी हे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या महिलेला उपचारासाठी ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. येथे डॉ. श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. ओंकार डाळिंबकर यांनी उपचार करून तिला पुढील उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले.
आपल्या परिसरात कांदे काढणीसाठी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय शेतमजूर मुक्कामी येत आहेत. त्यांना शेतात उघड्यावर झोपू न देता त्यांना निवाऱ्याची जागा द्यावी. तसेच, बिबट प्रवण क्षेत्राबाबत माहिती देऊन महिला व लहान मुलांची विशेष काळजी घेण्याबाबत खबरदार करावे. उंच जागेवर झोपावे. वनविभागाकडून परिसरात जनजागृती मोहीम व रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे.
- वैभव काकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर