
कल्याण महामार्गाच्या वाहतुकीत बदल
ओतूर, ता. १७ : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ वरील जुन्नर तालुक्यातील वाहतुकीत महामार्गाचे दुहेरी कॉंक्रिटीकरण करण्याचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे बदल केल्याची माहिती ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
या वाहतूक मार्गातील बदलाबाबत सहायक कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग मुरबाड (जि. ठाणे) यांचे पत्र ओतूर पोलीसांना प्राप्त झाले आहे. त्यानुसार कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील जुन्नर तालुका हद्दीतील वाहतूक शुक्रवारी (ता. १९) व पुढील प्रत्येक गुरुवारी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वेळ खिंडीत व इतर भागात दगड फोडण्यासाठी विस्फोटकाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. सदर वाहतूक कल्याणकडून येणारी वाहनासाठी कल्याण, माळशेज घाट, खुबी, करंजाळे, खिरेश्वर, कोल्हेवाडी, सांगणोरे, भोईरवाडी, पिंपळगाव जोगा, ओतूर, आळेफाटा, नगर; तर नगरकडून येणाऱ्या वाहनासाठी नगर, आळेफाटा, ओतूर, पिंपळगाव जोगा, भोईरवाडी, सांगणोरे, खिरेश्वर, करंजाळे, खुबी, माळशेज घाट, कल्याण अशी असणार आहे. तसेच, यादिवशी पर्यायी मार्गावर अवजड वाहनांवर बंदी असणार आहे. मात्र, रात्री अवजड वाहने व इतर वाहनांनाही मुख्य मार्गावरून वाहतूक खुली केली जाणार आहे.