
पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठाचे दागिने लांबविले
ओतूर, ता. २२ : ओतूर (ता. जुन्नर) येथील बसस्थानक परिसरात दोन भामट्यानी पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकास फसवून त्यांच्याकडील पाच तोळे सोन्याचे दागिने (अंदाजे १ लाख ८२ हजार रुपये मूल्य) हातचलाखीने लांबविले. ही घटना सोमवारी (ता. २२) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत ठाणे अंमलदार बाळशीराम भवारी यांनी माहिती दिली की, बबन विठ्ठल नलावडे (वय ६०, रा. भवानीनगर-धोलवड, ता. जुन्नर) यांनी ओतूर पोलिसात तक्रार दिली की, ते सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान ओतूर बसस्थानकात परिसरातून जात असताना दुचाकीवरील दोन जणांनी, ‘आम्ही पोलिस आहोत. तुम्हाला केव्हाचे हाक मारत आहोत. एवढे सोने अंगावर घालून कशाला फिरता? सोने काढून खिशात ठेवा,’ असे म्हणत त्यांना रूमालात सोने ठेवायला सांगत हातचलाखीने त्यांच्याजवळील ३४ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३ ग्रम वजनाची सोन्याची अंगठी, असे एकूण १ लाख ८२ हजार रुपये मूल्याचे पाच तोळे दोन ग्रॅम सोन्याचे दागिने लांबवले.