गाय अडली की श्रीमंत येतात...

गाय अडली की श्रीमंत येतात...

Published on

उंडवडी, ता. ७ : श्रीमंत जमादार वावगे. सोनवडी सुपे (ता. बारामती) गावातील हे नाव गेली अनेक वर्षे विश्वास, धीर आणि सेवाभावाचे प्रतीक बनले आहे. गाई अडल्या, प्रसुतीत अडथळा आला की ज्या व्यक्तीला प्रथम हाक मारली जाते, ते म्हणजे श्रीमंत. गेल्या दहा वर्षांत त्यांनी शंभराहून अधिक गाईंचे बाळंतपण करून अनेक शेतकऱ्यांच्या संसाराला नवसंजीवनी दिली. विशेष म्हणजे, त्यांनी ही सेवा कोणत्याही मोबदल्याशिवाय केली आहे.
आज पहाटेही अशीच जीवघेणी वेळ आली. येथील शेतकरी सुलोचना गोरख मोरे यांच्या गायीच्या वासराचे पाय गर्भात वळल्याने ती अडली होती. गाईचं तडफडणं... अंगणात चिंतेची सावली... कुटुंबातील महिलांचे दाटलेले डोळे... अशा वेळी श्रीमंत पुन्हा धावुन आले. गाईचा जीव धोक्यात असल्याची वार्ता समजताच श्रीमंत क्षणाचाही विलंब न करता तेथे पोहोचले. त्यांनी काळजीपूर्वक गाईवर हात फिरवत, अनुभवाने वासराचे पाय सरळ केले आणि गाईचे यशस्वी बाळंतपण घडवून आणले. त्यामुळेच मोरे कुटुंबियांच्या अंगणात आज कालवडीचे हंबरणे घुमत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा आहे. गावकरीही अभिमानाने म्हणत आहेत, ‘‘गाय अडली की श्रीमंत येतो, म्हणूनच आमचे संसार वाचतात.’’
याबाबत बोलताना श्रीमंत भावुक होतात. ‘‘मुक्या जनावरांची वेदना सहन होत नाही. त्यांचा हंबरडा मला बोलल्यासारखाच जाणवतो. त्यांच्या शेवटच्या क्षणात तरी आपण धावुन जावं हीच माझी अपेक्षा असते.’’ शेतकऱ्यांच्या संकटासमयी धावुन जाणारा हा जीवदाता आज सोनवडी सुपेचाच नव्हे, तर संपूर्ण परिसराचा खऱ्या अर्थाने देवदूत ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com