शिंदवणे घाटातील अपघातात औरंगाबादचे १९ जण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिंदवणे घाटातील अपघातात
औरंगाबादचे १९ जण जखमी
शिंदवणे घाटातील अपघातात औरंगाबादचे १९ जण जखमी

शिंदवणे घाटातील अपघातात औरंगाबादचे १९ जण जखमी

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. ६ : शिंदवणे (ता. हवेली) येथील घाटात ब्रेक निकामी होऊन पिकअप (क्र. एमएच २० ईएल ५३२४) उलटली. या अपघातात १९ जण जखमी झाले. त्यातील तीन जण गंभीर जखमी असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्वजण औरंगाबाद येथील आहेत. हा अपघात गुरुवारी (ता. ६) दुपारी अडीचच्या सुमारास झाला.
पिकअपमधील सर्वजण गुरुवारी (ता. ६) औरंगाबाद येथून देवदर्शनाला निघाले. त्यांनी प्रथम पंढरपूर येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते जेजुरी येथे दर्शनासाठी गेले. त्यानंतर ते आळंदी येथे जाण्यासाठी निघाले. जेजुरीवरून आळंदी येथे उरुळी कांचन मार्गे जात असताना शिंदवणे घाटातील वळणावर ब्रेक निकामी झाल्याने पिकअप उलटली. या अपघातात १९ जण जखमी झाले; तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. कांताबाई वाघ (वय ५८), बेबी आवारे (वय ५६), शकुंतला आवारे (वय ६४; सर्व रा. धोंदलगाव, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे असून, बाबासाहेब बाळनाथ ढंगारे (वय ३२, रा. धोंदल, ता. वैजापूर) असे पिकअप चालकाचे नाव आहे.
या अपघाताची माहिती कळताच कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी रुग्णवाहिका बोलावली. यावेळी रुग्णवाहिका चालक संतोष झोंबाडे, लक्ष्मण जाधव, सुरेश वरपे यांनी जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, शिंदवणे घाटामध्ये वारंवार अपघात घडत आहेत. असे वारंवार अपघात होऊनही प्रशासन याची गांभीर्याने दखल घेत नाही. शिंदवणे घाटातील या धोकादायक वळणावर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी येथील स्थानिक नागरिक करत आहेत.