
तीन वाहनांच्या अपघातात पाच जण किरकोळ जखमी
उरुळी कांचन, ता. २४ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे इंधनवाहू टँकर, आयशर टेम्पो व अल्टो मोटार यांच्यात शनिवारी (ता. २४) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास विचित्र अपघात झाला. त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मोटारीतील पाच जण किरकोळ जखमी झाले.
सारंग प्रशांत पाटील (वय २८), सुबोध प्रशांत पाटील (वय २७) अंकिता सारंग पाटील (वय- २४) श्वेता सुबोध पाटील (वय २४) व त्रिशिव सारंग पाटील (वय ८ महिने) (रा. सर्वजण बदलापूर ईस्ट, मुंबई), अशी अपघातात जखमी झालेल्या पाच जणांची नावे आहेत. ते कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील एका नर्सरीत झाडे पाहायला व खरेदी करण्यासाठी पुण्यावरून आले होते. त्यावेळी कदमवाकवस्ती येथे एचपी गेट नंबर ३च्या समोर सोलापूरच्या दिशेने जाताना समोरील आयशर टेम्पोने अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे पाटील यांनी देखील मोटार थांबवली. मात्र, पाठीमागून येणाऱ्या इंधनवाहू टँकरची त्यांच्या मोटारीला जोरदार धडक बसली. या अपघातात मोटार आयशर टेम्पोच्या खाली गेल्याने दबली. त्यात मोटारीतील प्रवाशांचे पाय अडकले. त्यामुळे त्यांना बाहेर पडता येत नव्हते. दरम्यान, लोणी काळभोर पोलिस पथकाच्या मदतीने त्यांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात पाटील कुटुंबीय किरकोळ जखमी झाले.