
उरुळी कांचन येथील ठाण्यास ग्रामीण पोलिस ठाण्याचा दर्जा द्या
उरुळी कांचन, ता. ६ : उरुळी कांचन येथील (ता. हवेली) स्वतंत्र पोलिस ठाण्याला ग्रामीण पोलिस ठाण्याचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी हवेली तालुका ओ. बी. सी सेलचे अध्यक्ष सुभाष टिळेकर यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत १२ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी टिळेकर यांनी निवेदनाव्दारे ही मागणी केली.
लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलिस ठाणे निर्माण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. हा निर्णय तत्काळ लागू होणार असल्याने आमदार अशोक पवार यांनी ही पाठपुरावा केला होता. उरुळी कांचन स्वतंत्र पोलिस ठाणे तयार करण्यासाठी सुमारे साडे सहा कोटी रुपयांच्या खर्चास राज्य शासनाकडून मान्यताही देण्यात आली आहे, असे टिळेकर यांनी सांगितले.
यावेळी उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, सदस्य मयूर कांचन, आदी मान्यवर उपस्थित होते.