उरुळीत चार वाहनांचा विचित्र अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरुळीत चार वाहनांचा विचित्र अपघात
उरुळीत चार वाहनांचा विचित्र अपघात

उरुळीत चार वाहनांचा विचित्र अपघात

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १७ : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन (ता. हवेली) येथे शुक्रवारी (ता. १७) पहाटे चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. त्यात कंटेनर (क्र. एम.एच. ४० सी.डी. ४२८५) चालक विकास सुरेंद्र (वय ३५, रा. रायपूर, छत्तीसगढ) याचा जागीच मृत्यू झाला. तर, चारही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघातामुळे महामार्गावर सुमारे पाच तास वाहतूक कोंडी झाली होती.
पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन येथे होले कॉम्प्लेक्ससमोर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास दुभाजकाशेजारी एक डंपर (क्र. एम.एच. ४३ बी.एक्स. ४६७५) निकामी झाला होता. त्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास या उभा असलेला डंपरचा अंदाज न आल्याने कंटेनरचा अपघात झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी या कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची (क्र. एम.एच. ४० सी.डी. ४२८५) धडक बसली. या अपघातात चालक विकास सुरेंद्र याचा जागीच मृत्यू झाला. या कंटेनरमधून लोखंडी रोल व लोखंडी प्लेटा महामार्गावर पडल्या. सुदैवाने त्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही व मोठा अपघात टळला. मात्र, पुढील कंटेनर डिव्हायडरवरून विरुध्द दिशेला जाऊन सुपर बॅटरी दुकानासमोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर (क्र. एम.एच. १२ एम.एल ८९०९) जाऊन आदळला. यात चारचाकीचे मोठे नुकसान झाले.
या अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे व त्यांच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनर चालकाला वाहनांमधून बाहेर काढून उपचारासाठी मदत केली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक तोरडमल अनिल गायकवाड, गणेश गोसावी, आरती खलचे, हवालदार बांगर यांनी वाहतूक सुरळीत केली.