
कोरेगाव मूळच्या सरपंचांवरील अविश्वास ठराव अखेर मंजूर
उरुळी कांचन, ता. २१ : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर झाला.
कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या १३ पैकी १० सदस्यांनी सरपंच विठ्ठल शितोळे यांच्या विरोधात बुधवारी (ता. १५) अविश्वास ठराव दाखल केला होता. उपसरपंच वैशाली सावंत, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब बोधे, भानुदास खंडेराव जेधे, मंगेश अशोक कानकाटे, सचिन गुलाब निकाळजे, लीलावती बापूसो बोधे, अश्विनी चिंतामणी कड, राधिका संतोष काकडे, मंगल जगन्नाथ पवार, पल्लवी रमेश नाझिरकर या १० सदस्यांच्या सह्यांचे अविश्वास ठरावाचे पत्र तहसीलदार किरण सुरवसे यांना देण्यात आले होते.
या अविश्वास ठरावाबाबत हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनी मंगळवारी (ता. २१) सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सदस्यांसाठी विशेष सभा घेतली. त्यावेळी ठराव मंजूर झाला.
दरम्यान, बहुमताने घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचे कामकाज करणे, सदस्यांना अपमानास्पद वागणूक देणे, मनमानी पद्धतीने ग्रामपंचायतीचे कामकाज करणे, अशा लेखी स्वरूपातील तक्रारी अविश्वास ठरावात ग्रामपंचायतीला दहा सदस्यांनी नमूद केल्या होत्या.